आपली शेती नैसर्गिक पावसावर बरीचशी अवलंबून आहे. या निसर्गाच्या लहरीपणाचा फटका अनेकदा बसलेला आहे. शरीरासाठी जसे रक्ताचे महत्त्व आहे तसेच शेतीसाठी पाण्याचे आहे. आपणाला पाण्यासाठी पावसावर अवलंबून रहावे लागते आणि या पावसाला अजून तरी पर्याय मिळालेला नाही. मात्र, नियोजनबध्द प्रयत्न केले तर निसर्गाच्या लहरीपणावर नक्कीच मात करता येऊ शकते. हे दाखवून दिले आहे जलयुक्त शिवार अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे.
राज्यातील अनेक भागांना अधून-मधून टंचाईचा सामना करावा लागलेला आहे. साधारणपणे चार वर्षातून एकदाच सुजलाम् सुफलाम् अशी परिस्थिती पहावयास मिळते. हे चक्र भेदण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान फार महत्त्वपूर्ण ठरलेले दिसत आहे. पाणीसमस्येवर कायमस्वरुपी मात करणा-या यशोगाथा प्रत्येक जिल्ह्यात निर्माण झाल्या आहेत.
गावाच्या शिवारातील पाणी गावातच साठवून भूपृष्ठावर जलसाठे निर्माण करणे आणि भूगर्भातील पाणी पातळी वाढविणे यावर या अभियानात भर देण्यात आला आहे. उत्सफूर्तपणे मिळालेला लोकसहभाग हे या अभियानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल. अहमदनगर जिल्ह्यात 2015-2016 या पहिल्या वर्षी 279 गावांमध्ये हे अभियान राबविण्यात आले. 2016-2017 या वर्षासाठी 264 गावांची निवड करण्यात आली. या सर्व गावांमध्ये जनतेच्या सहभागातून जलसंधारण व मृदसंधारण कामांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे साधारणपणे 56 हजार 568 टीसीएम इतका पाणीसाठा विकेंद्रीत स्वरुपात निर्माण झाला.
भालगाव हे जिल्हा परिषद गटाचे गाव असूनही सततच्या टंचाईमुळे स्थलांतराचे प्रमाण अधिक. ऊसतोडणी कामगारांचे गाव म्हणून भालगाव व परिसराची ओळख. पाणीटंचाईमुळे शेतीतून शाश्वत उत्पन्नाची हमी नसल्यामुळे ऊसतोडीशिवाय पर्याय नाही. जलयुक्त शिवार अभियानामुळे या भागाला पाणीटंचाईवरील उपाय सापडला. हे अभियान राबविण्यासाठी गावकरी एकत्र आले. लोकसहभाग व शासकीय योजनांच्या याजनांच्या माध्यमातून कामे झाली. गावक-यांची मेहनत फळाला आली. चांगला पाऊस झाला. पडणा-या पावसाचा थेंब न थेंब साठवला गेला. सर्व बंधारे, नदीपात्र, सलग समतर चर पूर्ण भरुन भालगाव टंचाईमुक्त झाले. जलयुक्तच्या माध्यमातून टंचाईमुक्त होण्याचा पहिला मान भालगावने मिळविला. समतल चराचे सुमारे 400 एकरावर काम पूर्ण झाले. कोट्यवधी लिटर पाणी गावाच्या शिवारात जिरले. अवघ्या 15 दिवसांत निसर्गाने अशी किमया केली, नदी, नाले, ओढे, बंधारे भरुन वाहू लागले. जलयुक्तच्या कामामुळे शिवार जलमय झाला. ‘गाव करील ते राव काय करील’ या म्हणीचा प्रत्यय आला.
बेलवंडी परिसरात जांभोळ ओढा नामशेष झाला होता. कृषि विभागाच्या अधिका-यांनी जलयुक्त शिवार अभियानाचे महत्त्व पटवून सांगितले. पाणीटंचाईची नेहमीच झळ बसत असल्याने ग्रामस्थांना जलसंधारणाचे महत्त्व पटले. शेतक-यांनी सुमारे 2 लाख रुपयांची वर्गणी जमा केली. साडेतीन किमी लांबीच्या या ओढ्यावर अभियान राबविण्यात आले. कुकडी पॅटर्न अंतर्गत बेलवंडी ग्रामस्थांच्या सहभागातून जांभोळ ओढ्याचे सुमारे 6 लाख खर्चून दीड किमी अंतरात खटकी बंधारे करण्यात आले. पहिल्याच पावसात काही बंधा-यात पाणीसाठा झाला. जमिनीत पाणी मुरल्यामुळे परिसरातील काही विहिरींना पाणी आले. जांभूळओढा नामशेष झाल्याने काम करणे आव्हान होते. पण अधिका-यांच्या इच्छाशक्तीमुळे व लोकांच्या सहकार्याने ते पेलता आले. जलयुक्त शिवार अभियानामुळे परिसरातील पाणी टंचाईचे चित्र बदलण्यास मदत झाली आहे.
जामखेड तालुक्यात पावसाच्या अवकृपेमुळे अनेकदा शेतक-यांना टंचाईशी सामना करावा लागत होता. मान्सून कालावधीत कमी पर्जन्यमान झाले तर भूजल पातळीत घट होवून शेतीपिकांना पाणी देणे अवघड जाते. जलयुक्त शिवार अभियान व लोकसहभागामुळे या परिस्थितीवर मात करण्यात यश आले आहे. जामखेड तालुक्यात नदी, नाले, ओढ्यांचे खोलीकरण, रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आत्तापर्यंत जामखेड तालुक्यात 19 गावातील तलावातून 13 लाख 71हजार 761 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. यामुळे 1 हजार 871 दशलक्ष घनफूट पाणीसाठा वाढणार आहे. शिवाय 1 हजार 459 हेक्टर जमीन या गाळामुळे सुपीक झाली आहे. हे अभियान सुरु झाल्यापासून 1 हजार 853कम्पार्टमेंट बंडींग, 625 हेक्टरचे 53 सिमेंट नालाबांध तर लोकसहभागातून 13 लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. ही कामे पूर्ण झाल्यामुळे 6 हजार 500 टीसीएम पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. पाणीटंचाईवर ‘जलयुक्त शिवार’ हा चांगला रामबाण उपाय ठरला आहे.
गावाजवळून वाहणा-या नद्या या संजीवनीचे काम करतात. पण गावक-यांच्या दुर्लक्षामुळे नदीत मोठ्या प्रमाणावर गाळ साचतो, वेड्या बाभळी अथवा इतर झाडे वाढतात. अशीच काहीशी परिस्थिती कर्जत तालुक्यातील कान्हाळा नदीची होती. जलयुक्त शिवार अभियान सुरु झाले. गावक-यांना प्रोत्साहन मिळाले. कान्हाळा नदीत भांडेवाडी ते जोगेश्वरवाडीपर्यंतच्या पात्रातील व दोन्ही तीरावरील वेड्या बाभळी काढण्यात आल्यामुळे पात्राचे रुप पालटले आहे. लेंडी नदीत भांडेवाडी ते बरमेवाडी पर्यंतच्या नदीपात्रातही कामे करण्यात येणार आहेत. या दोन्ही नदीपात्रातील ही कामे पूर्ण झाल्यानंतर कोट्यवधी लिटरचा पाणीसाठा झाला आहे. या दोन्ही नद्यांमध्ये ठिकठिकाणी बंधारे आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठा होण्यास मदत झाली. कर्जत परिसरात पाणीपातळी वाढण्यास तसेच कर्जत व उपनगरातील विंधनविहीरीना पाणी येण्यास मदत झाली. थोडक्यात, जलयुक्तची कामे शेतक-यांप्रमाणेच कर्जतकरांना वरदान ठरली आहे.
तीव्र टंचाईच्या काळात गोदडनाथ सागरात पाणी पाहून कर्जतकरांना अतीव आनंद झाला. ही किमया जलयुक्त शिवार अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे साध्य होऊ शकली. गोदडनाथ सागरामध्ये टंचाईच्या काळातही 13 कोटी लिटर पाण्याचा साठा होऊ शकला. महात्मा फुले जल व भूमी संधारण अभियानातून कर्जतलगतच्या कानवळा व लेंडी या दोन्ही नदीपात्रात जलयुक्त शिवार योजनेचे काम झाले. नद्यांचे खोलीकरण, सरळीकरण, गाळ काढणे, वेड्याबाभळी काढणे आदी कामे युध्दपातळीवर होवून नद्यांचे रुप पालटले. या दोन्ही बंधा-यात मिळून सुमारे 13 कोटी लिटर पाण्याची साठवणूक झाली आहे. या यशस्वी प्रयोगामुळे परिसराचे रुपच पालटले आहे. या भागातील पाणी पातळी वाढली असून बंद विहिरी व बोअरवेलला पाणी आले आहे. ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चिंता असताना या कामामुळे येथे कोट्यवधी लिटर पाणी साठले आणि कर्जतकरांना दिलासाही मिळाला.
नगर शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर भोरवाडी हे गाव आहे. या गावात मुख्यत: पाणीटंचाई ही मोठी समस्या होती. कमी उत्पादकता व सततच्या टंचाईमुळे शेतकरी हतबल झाले होते. भोरवाडी गावची जलयुक्त शिवार अभियानात निवड झाली. या अभियानांतर्गत अनेक कामे पूर्ण झाली. महात्मा फुले जल व भूमी संधारण अभियानातील निधीचा वापर करुन गावात जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यात आली. या योजनेमुळे भोरवाडी गावाचे चित्र बदलण्यास मदत होणार आहे.
नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील गावक-यांनी स्वत:हून पुढाकार घेत नाला खोलीकरणाच्या कामासाठी 51 लाख रुपयांची लोकवर्गणी जमा केली आहे. नाला खोलीकरणाच्या कामाचे अंदाजपत्रक कृषी विभागाने तयार करुन दिले. नाला खोलीकरणाचे फायदे अधिका-यांनी गावात जावून सांगितले. त्याची दखल घेवून गावक-यांनी लोकवर्गणीतून जमा होणा-या निधीतून नाला खोलीकरणाचे काम करण्याचा निर्धार केला, त्याला प्रशासनानेही साथ दिली. लोकसहभाग आणि प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने सारोळा कासार गावातील नाल्यांचे काम पूर्ण झाले.
नगर तालुक्यातील अकोळनेर येथील वालुंबा नदीच्या खोलीकरणासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावक-यांनी प्रत्येकी 200 रुपयांची वर्गणी गोळा करत लोकसहभाग नोंदविला. त्यास अहमदनगर प्रेस क्लबने हातभार लावल्याने गावक-यांनीही समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मन्सूर शेख यांनी ही मदत गावक-यांकडे सुपूर्द केली. नदी खोलीकरणाच्या कामाचा परिसरातील शेतक-यांना फायदा होणार आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत भोसे या गावामध्ये कंम्पार्टमेंट बंडींग, 126 हेक्टर नवीन माती नाला, बांध, तलावातील गाळ काढणे, लोकसहभागातून पाझर तलावातून गाळ काढणे इत्यादी कामे पूर्ण झाली. हरियाली योजना व नदी खोरे योजना इत्यादी माध्यमातून जलसंधारणाची कामे करण्यात आली. ही कामे चालू असताना विहिरींनी तळ गाठलेला होता. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरही चालू होते. परंतु चालू वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे मोठया प्रमाणात पाणीसाठा झाला. त्यामुळे गावातील विहिरींची पाणीपातळी वाढून गावचे चित्र बदलून गेले. टँकरची ओळख असणा-या गावात रब्बी हंगामात चांगल्या प्रकारचे उत्पादन घेण्यात आले. या योजनेमुळेच गावाचे चित्र पालटून गेले.
नगर तालुक्यातील चिचोंडीपाटील येथे लोकसहभागातून मेहेकरी नदी खोलीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. नदीचे रुंदीकरण व खोलीकरण झाल्यामुळे याचा लाभ निश्चितच गावाला होणार आहे. पावसाचे पाणी मोठया प्रमाणात अडविणे शक्य झाल्यामुळे गाव जलयुक्त होण्यास मदत होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाची यशस्वी अंमलबजावणी जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री प्रा. राम शिंदे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. या अभियानामुळे शाश्वत जलसाठा निर्माण होऊन कृषि उत्पादनात वाढ होईल, शेतक-यांना दिलासा मिळेल.
राजेंद्र सरग, जिल्हा माहिती अधिकारी, अहमदनगर (मो 9423245456)