जळगाव

महान्यूज ‘यशकथा’ सदरासाठी मजकुर

गोंदेगाव शिवारात ‘जलयुक्त’ मुळे मिळाले पिकांना जीवदान

जळगाव, दि.२९- सध्या पावसाळा सुरु झाला असला तरी अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुका हा असाच पावसाची अवकृपा असलेला तालुका. अद्यापही येथे म्हणावे तसे पर्जन्यमान झालेले नाही. या तालुक्यातील गोंदेगाव येथील शेतकऱ्यांना पहिल्या पावसात जलयुक्त शिवार योजनेच्या बंधाऱ्यात जमा झालेल्या पाण्याचा प्रभावीपणे वापर करुन आपले धोक्यात आलेले पिक वाचवण्यात यश मिळाले आहे.

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्याभरात आतापावेतो सरासरी ८७.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जामनेर तालुक्यात काल २१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी बागायती कापसाची पेरणी केली होती त्या शेतकऱ्यांना मधल्या काळात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवणे अवघड झाले होते. मात्र त्याच वेळी जलयुक्त शिवार योजनेमुळे त्यांना ऐनवेळी साथ मिळाली. यापरिसरात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नाला खोलीकरण, जुने बंधारे दुरुस्ती आदी कामे मोठ्याप्रमाणावर हाती घेऊन पुर्ण करण्यात आलीत. त्यामुळे मधल्या काळात आलेल्या तुरळक पावसानेही याठिकाणी लहान लहान जलसाठे निर्माण झाले. असेच काम गोंदेगाव शिवारातही करण्यात आले होते. येथल्या नाल्यात २८५ मीटर लांब, १० मीटर रुंद आणि दोन मीटर खोल असे खोलीकरण करुन जुन्या नादुरुस्त बंधाऱ्याची दुरुस्ती करुन पाणी अडविण्यात आले आहे. गेल्या शनिवारी झालेल्या पावसाने तेथे ५.७० टीसीएम जलसाठा निर्माण झाला आहे. हा जलसाठा आपल्या जळणाऱ्या पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी वापरला.

या नाल्याच्या काठावर असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली कपाशी वाचविण्यासाठी या जलसाठ्यातील पाणी पंपाने उपसून आपल्या विहिरीत टाकायला सुरुवात केली. आणि विहीरींचे पुनर्भरण करता करता त्यांनी आपल्या शेतातला उगवण झालेल्या कपाशीच्या रोपांना ठिबक संचाद्वारे पाणी देऊन जीवदान दिले. या एका बंधाऱ्यामुळे परिसरातील ३५ एकराहून अधिक क्षेत्रावर लागवड झालेली कपाशी यामुळे वाचली. अन्यथा हे पिक उगवण होताच हातचे गेले असते. पिकाच्या सुरुवातीच्या वाढीसाठी जलयुक्त शिवार मुळे अडलेले हेच पाणी पिकांना आणि पर्यायाने शेतकऱ्यांना जीवनदान देणारे ठरले आहे.

मिलिंद मधुकर दुसाने,माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव.

दि.15 जुलै 2016

महान्यूज ‘यशकथा’ सदरासाठी मजकुर मागेल त्याला शेततळे

कडगावची यशकथाः जलपातळी वाढे, तेव्हा फायदा कळे

जळगाव, दि.१५- महाराष्ट्र शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना सुरु केली. या योजनेचा उद्देश शेतात पडणारे पावसाचे पाणी शेतातच जिरावे आणि शेतातली जमिनीतील ओल ही भविष्यातही टिकावी हा आहे. या उद्देशाने जळगाव जिल्ह्यात ही योजना राबविणारी कृषि विभागाची यंत्रणा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली. सुरुवातीला इतक्या कमी अनुदानात कसे शेततळे होईल? असा प्रश्न उपस्थित झाला. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना त्याचे फायदे समजावण्यात आले. त्यानुसार शेतकऱ्यांनी हळू हळू प्रतिसाद दिला.

कडगाव या जळगाव तालुक्यातील लहानशा गावातील ललीत शरद येवले हा तरुण शेतकरी. डिप्लोमा सिव्हील इंजिनिअरिंग झाल्यानंतर शेतीकडे वळलेल्या या सुशिक्षित शेतकऱ्याला या योजनेचे महत्त्व पटले. म्हणून त्याने आपल्या सव्वा दोन एकर शेतात 15X15X3 मीटर आकाराचे शेततळे केले. जवळून वाहण्याऱ्या लहानशा ओहळाचा प्रवाह शेततळ्यात घेऊन नंतर दुसऱ्या बाजूने सांडवाही केला. नुकत्याच गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने हे शेततळं चांगलं भरलं. तहानलेल्या जमीनीत त्यातलं पाणी लगेच जिरलं सुद्धा.

हे पाणी जिरल्यावर पुन्हा आलेल्या पावसानंतर तळं पुन्हा भरलं आणि पुन्हा जिरलं. त्यामुळे त्यांच्या शेतातील बोअरिंगचे पाणी वाढले. आणि त्यांनी यंदा आपली जिरायत पिकपद्धत बदलवली.  सध्या त्यांनी शेतात तूर, उडीद या कडधान्य पिकांची आणि हळदीची लागवड केली आहे. त्यासाठी त्यांनी ठिबक सिंचनाचा कल्पक वापर केला आहे. तसेच पेरू आणि लिंबू या फळबागांची लागवडही त्यांनी उर्वरित क्षेत्रात केली आहे. शेततळ्याच्या बांधांवर सिताफळ आणि शेवग्याची लागवड केली आहे. या शेततळ्यासाठी ललीत येवले यांना 22 हजार 110 रुपयांचे अनुदानही मिळाले. एका शेततळ्यामुळे ललीत येवले यांना झालेला फायदा पाहुन आता आजूबाजूचे शेतकरी आपल्याही शेतात शेततळे व्हावे यासाठी स्वतःहून पुढे येत आहेत.

मिलिंद मधुकर दुसाने,माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव.

दि.19 जुलै 2016

महान्यूज ‘यशकथा’ सदरासाठी मजकुर
मागेल त्याला शेततळे

शेततळ्यांचं गावः नगाव

जळगाव, दि.१९- मागेल त्याला शेततळे या योजनेचे फलित काय? असा प्रश्न कुणी केला, तर या प्रश्नाचं उत्तर अमळनेर तालुक्यातल्या नगाव या गावात मिळतं. आज या एकाच गावात तब्बल 50 शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपला परिसर जलसमृद्ध केला आहे. त्यामुळे नगावची ओळख आता ‘शेततळ्यांचं गाव’ अशी होऊ लागली आहे.

नगाव हे अमळनेर तालुक्यातलं एक गाव. तसं हे गाव सगळंच कोरड ठाक. उन्हाळ्यात पाण्यासाठीची वणवण कायमचीच. शेतीतही एक किंवा फारतर दोन हंगाम. त्यावर करायची ती वर्षभराची गुजराण. सधन शेतकरी विहिर, बोअरवेल असे प्रयत्न करतातही पण जमिनीच्या पोटात नाही तर विहिरीत तरी पाणी येणार कुठून? अशा परिस्थितीत शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेच्या प्रचार प्रसिद्धीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना जलसंधारणाचे आणि पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्याचे महत्त्व पटले. त्यात शासनाने पुढाकार घेतला. ‘मागेल त्याला शेततळे’ ही अभिनव योजना आली. प्रत्येकाला आपल्या विहिरीला सहज पाणी मिळेल याचा विश्वास निर्माण झाला. त्यासाठी गावचे सरपंच बापू कोळी यांनी गावातल्या शेतकऱ्यांना एकत्र केलं. आणि एक दोन नव्हे तर तब्बल 51 शेतकऱ्यांनी आपल्या शेतात शेततळे करण्याचे निश्चित केले. मे महिन्याच्या भर उन्हात हे शेतकरी आपापल्या शेतात शेततळे करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. शासनाच्या अनुदानामुळे आर्थिक खर्चाचा भर बऱ्यापैकी हलका झाला. या गावात झालेल्या 51 शेततळ्यांपैकी 30 शेततळे हे 25X20X3 मीटर या आकाराची आहेत. ही सर्व शेततळी मिळून तब्बल 172.89 टीएमसी इतका जलसाठी होणे आणि त्याही पेक्षा तो जमिनीत जिरणे अपेक्षित आहे. पहिल्याच पावसात पाणी साचायला आणि जमिनीत मुरायला सुरुवातही झाली आहे. या जलसाठ्यामुळे तब्बल 345.78 हेक्टर क्षेत्र हे संरक्षित सिंचनाखाली आलं आहे. ही 51 शेततळी करणाऱ्या शेतकऱ्यांना 23 लाख 57 हजार 783 रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे.

पावसाच्या आगमनानंतर जेव्हा हे तळे पाण्याने भरले तेव्हा शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. गेल्या आठवड्याभरात या तळ्यांमध्ये साचलेले सर्व पाणी जमिनीत जिरले आहे. आजुबाजुच्या विहिरींची पातळी लक्षणीयरित्या उंचावल्याने या योजनेचे महत्त्व लोकांना ‘हातच्या काकणाला आरसा कशाला’ या उक्तीप्रमाणे पटले आहे. आता नगाव हे गाव शेततळ्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध होत आहे.

मिलिंद मधुकर दुसाने,माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव.
त्यावेळी अव्वल प्ले विराम