सातारा

मार्डीकरांची जलयुक्तचे काम प्रेरणादायी

माण तालुक्यातील मार्डी ग्रामस्थांनी एकत्र येवून मार्डी ग्रामविकास प्रतिष्ठानची स्थापना केली. शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानात मार्डीकरांनी 65 हजार मिटर सीसीटीचे काम पूर्ण केले. नुकताच झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे त्याचा दृष्य परिणामही दिसू लागला. मार्डीकरांचे हे काम निश्चितच प्रेरणादायी आहे.

सातत्याने टंचाईग्रस्त म्हणून ओळखले जाणारे मार्डी हे गाव हा शिक्काच पुसुन टाकण्यासाठी झपाटून कामाला लागले आहेत. शासनाच्या विविध विभागात अधिकारी, कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या मार्डीकरांनी आपल्या 1 महिन्याचा पगार गावच्या विकासासाठी दिला आहे. हा निधी 10 लाखाहून अधिक जमा झाला. गावाला पाच वर्षे टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. ग्रामस्थांनी श्रमदान करुन तसेच शासनाच्या माध्यमातून गावामध्ये मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे केली. रोजगार हमी योजना, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून एकात्मिक पाणलोट विकासाच्या माध्यमातून 22 बंधार उभे करण्यात आले. 1150 बांध बंदिस्तीचे काम करण्यात आले. यातून 2180 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, अशी माहिती मार्डी ग्रामविकास प्रतिष्ठानचे संजय देशमुख यांनी दिली.

गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने चार वेळा हजेरी लावली. या पावसामध्ये जलसंधारणाच्या केलेल्या कामांमुळे पावसाचे पडलेले पाणी जमिनीत मुरले. त्याचबरोबर विहिरी भरल्या, बंधारे भरले हा दृष्य परिणाम आज दिसू लागला आहे. येणाऱ्या काळात चांगला पाऊस पडल्यास मार्डीची वाटचाल टँकरमुक्तीकडे असेल असा विश्वासही श्री. देशमुख यांनी बोलून दाखविला.

राज्य शासनाची जलयुक्त शिवार अभियान हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप फायदेशिर ठरणारे आहे, असे सांगून मार्डीचे शेतकरी शिवाजी पोळ म्हणाले, कोरडी ठणठणीत पडलेली विहीर केलेल्या जलसंधारणांच्या कामांमुळे आणि नुकत्याच झालेल्या पावसामुळे आज भरलेली दिसते. हे केवळ चार वेळा पडलेल्या पावसाचा दृष्य परिणाम आहे. यापूर्वी असे कधी झाले नव्हते. जलसंधारणाची अशी कामे यापुढेही अशीच चालू राहतील, असेही ते म्हणाले.

मार्डीकरांच्या नियोजनाचा त्यांनी केलेल्या जलसंधारण कामांची पहाणी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी नुकतीच केली. झालेल्या पावसामुळे दिसणारा परिणाम पाहून त्यांनी मार्डीकरांचे कौतुक केले आणि हीच प्ररेणा इतर गावांनीही घ्यावी, अशा शब्दात समाधान व्यक्त केले. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून गावागावात पाणी चळवळ सुरु झाली. आता गावातील साठलेल्या प्रत्येक पाण्याचे नियोजन करणे हेही तितकेच महत्वाचे आहे.

प्रशांत सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, सातारा

रोल मॉडेल चांदक-गुळुंब ओढा जोडनं आणलं ओव्हरफ्लो पाणी..!

वाई मधील चांदक-गुळुंब हा ओढा जोड प्रकल्प देशातील आगळा वेगळा रोल मॉडेल ठरला आहे. सध्या झालेल्या पावसाने या ओढा जोडनं गुळुंबचा पाझर तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे. हा तलाव भरुन सध्या वाहतोय. या ओढा जोड प्रकल्पाने गुळुंब ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील पाण्याच्या चिंतेच्या जागी आनंद फुलविला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे अध्यक्ष एस. रामादुराई यांनी मे 2015 मध्ये चांदक- गुळुंब ओढा जोड प्रकल्पाला अचानक भेट देऊन प्रशासनाच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली होती. या प्रकल्पाची माहिती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

काय आहे चांदक-गुळुंब ओढा जोड प्रकल्प ?
 • चांदक येथील ओढा पावसाळ्यामध्ये पूर्ण क्षमतेने भरुन वाहतो . या ओढ्यावर चार ठिकाणी बांध आहेत की जे पूर्ण क्षमतेने भरुन वाहतात
 • या उलट गुळुंबमध्ये पडणाऱ्या कमी पावसामुळे पाणी टंचाई भासते.
 • दरवर्षी जिल्हा प्रशासनातर्फे गुळुंब परिसरातील 14 गावांमध्ये पाण्यासाठी टँकर द्यावा लागतो
 • जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी भेट देऊन हा प्रकल्प हाती घेतला.
 • चांदक ते गुळुंब पाझर तलाव हे अंतर 1130 मीटर इतके आहे. या दरम्यान 500 मि. मि. व्यासाची पाईपलाईन टाकली आहे.
 • गुळुंब येथील पाझर तलावाची क्षमता 497 टीसीएम इतकी आहे.
 • या प्रकल्पासाठी जमा निधी - मॅप्रो कंपनीतर्फे 20 लाख, ज्ञानदीप सहकारी पतसंस्थेकडून 20 लाख, आमदार मकरंद पाटील यांच्या फंडातून 15 लाख, गुळुंब ग्रामस्थांकडून 5 लाख, किसनवीर सहकारी साखर कारखान्याकडून उत्खननासाठी 25 लाख असा एकूण 85 लाख
 • गुळूंबची लोकसंख्या 2 हजार 500
 • पाझर तलावांखाली असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या 3 तसेच कृषी क्षेत्रासाठी 28 विहिरींना फायदा होणार आहे.
 • या ओढा जोड प्रकल्पामुळे 1 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली
 • 10 लाख 80 हजार वार्षिक टँकरवर होणारा खर्च पूर्णपणे थांबणार. चांदक आणि गुळुंब या दोन्ही गावातील 5 हजार लोकांच्या

पाण्याचा प्रश्न निकालात.

सध्या गुळुंबचा पाझर तलाव ओव्हर फूल्ल झाला आहे. या विषयी दिलेल्या काही निवड प्रतिक्रीया.

रवींद्र खेबुडकर (तत्कालीन प्रांताधिकारी) : गुळुंब ग्रामस्थांना या प्रकल्पाच्या माध्यमातून आता पाणी मिळणार आहे. हेच खूप मोठे माझ्यासाठी समाधान आहे. यामध्ये सर्वांचे योगदान आहे.

अल्पना यादव (तत्कालीन सरपंच) : सर्व अधिकारी, ग्रामस्थ या सर्वांनी हा प्रकल्प मेहनतीने पूर्ण केला आहे. गावाला नेहमी टँकर लागायचा. आता तो लागणार नाही. झालेल्या पाण्याचा प्रत्येक थेंबाचा आम्ही काटकसरीने वापर करु.

दीपा बापट (गट विकास अधिकारी) : वर्षापूर्वी पूर्ण झालेल्या प्रकल्पाचे यश आज पाहताना खूप आनंद होत आहे. अधिकारी, ग्रामस्थ एकत्र आल्यानंतर काय घडू शकतं हे दाखविणारा हा प्रकल्प आहे.

अतुल म्हेत्रे (तहसीलदार) : जिल्हाधिकारी, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, तत्कालीन प्रांताधिकारी आणि तत्कालीन तहसीलदार या सर्वांनी या प्रकल्पासाठी खूप मेहनत घेतली आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. गावचा पाणी प्रश्न निकालात निघाला आहे.

राजकुमार साठे (उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग) : चांदक तलावामधून वाया जाणारे पाणी गुळुंबच्या तलावात आणून सोडले. सध्या तलाव भरला असून सांडव्यावरुन पाणी वाहत जात आहे. यामुळे निश्चितच परिसरातील शेतीसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी फायदा होणार आहे आणि उत्पन्नातही वाढ होणार आहे.

फतेसिंग संकपाळ (शेतकरी): गावचा पाण्याचा प्रश्न आता मिटणार आहे.

विष्णू यादव (शेतकरी) : संपूर्ण जमीन भिजून चांगले उत्पन्न मिळणार आहे.

मनीषा यादव (ग्रामस्थ) : दोन-तीन वर्ष पाऊस नव्हता. सध्या झालेल्या पावसामुळे तलाव भरला आहे. पुढील दोन-तीन वर्षाची चिंता मिटलेली आहे.

सध्या ओसंडून वाहणारा गुळुंबचा तलाव आणि त्याहीपेक्षा ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहणारा आनंद हे जलयुक्त शिवार अभियानाचे यश आहे. चांदक-गुळुंब ओढा जोड प्रकल्पानं पाण्याबरोबरच ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर हा आनंद ओव्हर फूल्ल केला आहे. हेच या प्रकल्पाचे रोल मॉडेल म्हणावे लागेल.

तोंडले-मोगराळे साखळी बंधाऱ्यांमुळे मानवी जीवनाबरोबर वन्य जीवन समृद्ध !

माण तालुक्यातील तोंडले-मोगराळे वन क्षेत्राच्या हद्दीतून वाहणाऱ्या आड ओढ्यावर वन विभागाने नऊ सिमेंट बंधाऱ्यांची साखळी उभारली. या साखळीने माण, फलटण तालुक्यातील मानवी जीवनाबरोबरच वन्य जीवनही समृद्ध केले आहे. सध्या या बंधाऱ्यांमधून 10 टीसीएम इतका पाणीसाठा झाला असून हे पाणी ओसंडून वाहत आहे.

माण तालुक्यामधून तोंडले आणि मोगराळे या गावाच्या वनक्षेत्राच्या हद्दीतून आड ओढा वाहत जातो. हा ओढा पावसाळ्यामध्ये भरुन त्याचे पाणी तसेच पुढे वाहून जायचे. पुन्हा हा ओढा रिकामा राहयचा. त्यामुळे पाण्याची कमतरता भासायची या ओढ्यावर वन विभागाने तोंडले हद्दीत सात तर मोगराळे हद्दीत दोन अशा नऊ सिमेंट बंधाऱ्यांची साखळी उभी केली. हे सर्व बंधारे मान्सूनपूर्व पावसानेच भरले आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने हे बंधारे तुडूंब भरुन वाहू लागले आहेत. या बंधाऱ्यातून वाहनारे पाणी फलटण तालुक्यातील गावांनाही पाझर तलावाद्वारे मिळू लागले आहे.

दहिवडीचे वनक्षेत्रपाल आर.बी. धुमाळ यांनी याविषयी माहिती दिली. आड ओढ्यातून वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे त्याचा फायदा होत नव्हता उलट परिसरातील गावांमध्ये टँकर सुरु करावे लागत असत. जलयुक्त शिवार अभियान सन 2015-16 अंतर्गत वन विभागाने तसेच प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्यासह या ओढ्याची पहाणी केली. या ओढ्यावर तोंडले आणि मोगराळे हद्दीत बंधाऱ्यांची साखळी निर्माण केली. मान्सूनपूर्व पावसानेच हे सर्व बंधारे भरले. गेल्या आठवड्यात झालेल्या मान्सुनमुळे सध्या हे बंधारे ओसंडून वाहू लागले आहेत. या बंधाऱ्यांमध्ये 10 टीसीएम इतका पाणीसाठा झालेला आहे. या ओढ्यामुळे माण तालुक्यातील काही गावे त्याचबरोबर फलटण तालुक्यातील गावांना निश्चितपणे फायदा होणार आहे. साठलेल्या पाण्यामुळे भूगर्भातील पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. त्याचबरोबर या परिसरात सध्या लांडगे, कोल्हे, ससे, विविध पक्षी यांचा वावर वाढला आहे.

वन विभागाने केलेल्या या कामाचा दृष्य परिणाम आता दिसू लागला आहे. माण व फलटण या दोन्ही तालुक्यांमध्ये शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी याचा फायदा होणार आहे. या पाणीसाठ्यामुळे टँकरची संख्याही आता घटली आहे. मानवी जीवनाच्या समृद्धीबरोबरच वन विभागाच्या या कामांमुळे वन्य जीवनही समृद्ध बनले आहे.

जलयुक्त विसापूरची ठिबकयुक्त आणि खोरेमुक्तीकडे वाटचाल

टंचाईग्रस्त म्हणून ओळख असणाऱ्या खटाव तालुक्यातील डोंगर कपारीत वसलेल्या विसापूरकरांनी लोकसहभागाची ताकद काय असते, ते शासनाचे जलयुक्त शिवार अभियान राबवून दाखवून दिले आहे. मोठ्या प्रमाणातील लोकसहभाग, श्रमदान व शासनाच्या मदतीने जलयुक्त शिवार अभियानाची कामे संघटीतपणे केल्याने आज विसापूरच्या शिवारात जागो जागी पाण्याचे साठे पहायला मिळत आहेत. जलयुक्त बनलेल्या विसापूरची ठिबकयुक्त आणि खोरेमुक्तीकडे जाणारी वाटचाल निश्चितच प्रेरणादायी बनेल.

डोंगर कपारीत वसलेल्या विसापूरची लोकसंख्या अवघी 5 हजार. गावचे पर्जन्यमान सरासी 650 ते 700 मि.मी. गावामध्ये 576 हेक्टर बागायत क्षेत्र, 650 जिरायत क्षेत्र तर पडीक क्षेत्र व डोंगर माथा ते पायथा 417.87 हेक्टर असे एकूण 1644.67 हेक्टर भौगोलीक क्षेत्र. गावामध्ये असणारे राम ओड्याचे तसेच गाव ओड्याचे लोक वर्गणीतून रुंदीकरण व खोलीकरण केले. या ओड्यांवर 16 वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून 2.25 कोटी लिटर पाणी अडविले गेले आहे. लोक वर्गणी, कृषी विभाग, यांत्रिकी विभाग यांच्या मदतीने माथा ते पायथा या संकल्पनेनुसार गावामध्ये 450 हेक्टर डीपसीसीटी पूर्ण केलेली आहे.

इजाळीमधून 7 हजार 440 क्युबीक मिटर, वाणदरामधून 9920 क्युबीक मिटर, आवारवाडीमधून 8080 क्युबीक मिटर तर कोकाटेमधून 3200 क्युबीक मिटर अशा चार पाझर तलावांमधून एकूण 28 हजार 640 क्युबीक मिटर गाळ लोकसहभाग व यांत्रिकी विभाग आलोरे यांच्या मदतीने काढण्यात आला. हा गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये टाकून शेत जमिनही वहिवाटीत आणली आहे. लोकवर्गणीतून 6 माती नालाबांधमधून गाळ काढून त्यांची पाणी साठवण क्षमता वाढविली आहे. लोकवर्गणीतून 5 सिमेंट बंधाऱ्यांतील गाळ काढला आहे. रोजगार हमी योजनेतून 5 विहिरींचे पुनर्भरण व 2 विंधन विहिरींचे पुनर्भरण करण्यात आले आहे.

गाव ठिबकयुक्त आणि खोरेमुक्त करणार - सरपंच

जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल यांच्या प्ररेणेने जनजगृती करुन लोकसहभागातून 16 वनराई बंधारे बांधून सुमारे अडीच कोटी लिटर पाणीसाठा निर्माण केला आहे. अवघ्या दीड महिन्यात 450 हेक्टर सीसीटीचे काम पूर्ण केले. यामध्ये यांत्रिकी विभागामार्फत 100 ते 110 हेक्टर आणि उर्वरित लोकसहभागातून करण्यात आलेले आहे. सध्या गावामध्ये कृषी विभागा आणि स्थानिकस्तर यांच्या माध्यमातून 14 सिमेंट बंधारे उपलब्ध झाले आहेत. गावामध्ये निर्माण झालेला पाणीसाठा काटकसरीने वापरण्यासाठी गाव ठिबकयुक्त आणि खोरे मुक्त करत आहोत. यासाठी ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळत असल्याची भावना सरपंच सागर साळुंखे यांनी बोलून दाखविली.

गणपत साळुंखे (शेतकरी) ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि शासनाच्या सहकार्याने गावामध्ये भरपूर कामे झाली. त्या माध्यमातून जागोजागी पाणी साठलयं. याच पाण्यावर माझी चार एकर जमीन भिजतीय. निर्माण झालेले पाणी अधिककाळ टिकण्यासाठी माझी शेती सध्या मी ठिबकवर केली आहे.

राजेंद्र साळुंखे (अध्यक्ष विकास सेवा सोसायटी) वनराई बंधाऱ्यांपासून गावचा कायापालट करण्यासाठी सुरुवात केली आणि गावं कामाला लागले. खरोखर गाव काम करते का नाही हे पाहण्यासाठी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला हे भेटी देत. गावाने केलेले काम पाहून आणखी 14 सिमेंट बंधारे मिळाले आहेत. या बंधाऱ्यांमधून 1130 टीसीएम पाणीसाठा होणार असून 700 हेक्टर जमीन पाण्याखाली येईल. सध्या गाव 100 टक्के ठिबकवर करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे.

टंचाईमुक्तीचा शिक्का विसापूरकरांनी आपल्या कामातून पुसून टाकला आहे. जलयुक्तकडून ठिबकयुक्तकडे आणि खोरे मुक्तीकडे विसापूरची वाटचाल ही अन्य गावांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

जलयुक्तमुळे हिवरे झाले हिरवेगार...!

सलग तीन वर्ष टँकर लागणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील हिवरे गावात जलयुक्तमुळे केलेली कामे, मोठ्या प्रमाणातील लोकसहभाग आणि पडलेला पाऊस यातून हिवरे गावाच्या शिवारात पाणी तर खळाळले आहेच, त्याशिवाय हिरवीगार पिकं डोलू लागली आहेत.

कोरेगाव तालुक्यातील हिवरे हे अवघे 1 हजार 378 लोकसंख्या असलेले गावं. या गावामध्ये सलग तीन वर्षांपासून टँकर लागत असल्याची माहिती सरपंच अजित खताळ यांनी दिली. शासन, किसनवीर सहकारी साखर कारखाना आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातून गावामध्ये साडेसतरा हजार मीटर डीपसीसीटी, 30 हेक्टर सीसीटी, लहान मोठे 36 मातीचे बंधारे, 32 जुन्या पाझर तालवांमधून गाळ काढण्यात आला आणि काढण्यात आलेला गाळ शेतामध्ये टाकून जमीन वहिवाटीखाली आणली. एकूण लावण्यात 540 हेक्टर जमिनीपैकी जवळपास 50 टक्के क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्यात आली आहे. यामध्ये ऊस, आले, घेवडा, सोयाबीन, बाजरी, टोमॅटो यांचा समावेश आहे.

33 एकर गायरान जमिनीत साडेपाच हजार सिताफळांची रोपे आली आहेत. यापासून साडेपाच लाखाचे उत्पन्न हे गावासाठी मिळणार आहे. एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम, ग्रामपंचायतीच्या 13 व्या वित्त आयोग, पर्यावरण निधी, ग्रामपंचायत स्व निधी, लोक वर्गणी यामधून गावामध्ये जलसंधारणाची कामे करण्यात आली. यामधून 8 कोटी लिटर पाणी अडविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर दैनिक सकाळच्या तनिष्कने दिलेल्या 2 लाख रुपयांमधून फरशीचा जुना बंधारा दुरुस्त करण्यात आला. सत्यमेव वॉटर कप स्पर्धेसाठी आंबेजोगाई गावाने हिवऱ्यामध्ये प्रशिक्षण घेतले आहे. यशदामार्फत नुकतेच 18 आयएसएस प्रशिक्षणार्थींनी गावाला भेट दिली आहे.

गेल्या तीन-चार महिन्यांपासून 10 रुपयांमध्ये 20 लिटर शुद्ध पाण्याचा जार ग्रामस्थांना घरपोच दिला जातो, अशी माहिती सरपंच श्री. खताळ यांनी यावेळी अभिमानाने दिली.

दादासाहेब केंडे (शेतकरी) : माझे वय 62 असून या 62 वर्षात आज जेवढे पाणी पाहतोय तेवढे यापूर्वी कधीही पाहिले नाही. ही किमीया जलयुक्त शिवार अभियानाची आहे. भविष्यामध्ये पाण्याची कमतरता भासणार नाही.

शंकर खताळ (शेतकरी ) : पाच विंधन विहिरी घेतल्या. अगदी 300 फुटापर्यंत परंतु पाणी लागले मिळाले नाही. गावात जलयुक्त शिवारची कामे झाल्यामुळे विंधन विहीर पाण्याने भरुन वाहत आहे. विहीर पण भरुन वाहत आहेत. ही शेतकऱ्यांसाठी समाधानाची बाब आहे.

हणमंत जगदाळे (शेतकरी) : गावामध्ये जलयुक्त शिवारची कामे झाल्यामुळे शिवारात पाणी खेळू लागले आहे. त्यामुळे आम्हाला आता टंचाई भासणार नाही. निश्चितपणे आम्ही आता बारमाही पिके घेऊ शकतो.

टँकर लागणाऱ्या हिवरे गावात जलयुक्त शिवार अभियानामुळे शिवारात पाणी दिसू लागले आहे. याच पाण्यावर सध्या हिरवीगार पिकं डोलू लागली आहेत. हे दृष्य निश्चितच इतर गावांसाठी प्रेरणादायी आहे.

प्रशांत सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, सातारा
Achievement
अ. क्र. अचीवमेंट फाइल शीर्षक अचीवमेंट फाइल
1 satara1 pdf डाउनलोड (40.17 KB)
2 satara2 pdf डाउनलोड (52.96 KB)
3 satara3 pdf डाउनलोड (52.96 KB)
4 satara4 pdf डाउनलोड (51.77 KB)
5 satara5 pdf डाउनलोड (56.85 KB)
6 satara6 pdf डाउनलोड (55.48 KB)
7 satara7 pdf डाउनलोड (55.48 KB)
8 satara8 pdf डाउनलोड (40.17 KB)
9 pdf डाउनलोड (40.17 KB)
त्यावेळी अव्वल प्ले विराम