सोलापूर

सोलापूर

जलयुक्त शिवार अभियानाची नियोजनबध्द अंमलबजावणी

राज्यात सतत उद्भवणारी टंचाई सदृश्य परिस्थिती विचारात घेवून ‘सर्वांसाठी पाणी – टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019’ साठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला. या अभियानाद्वारे पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाचे शिवारात अडविणे, भुगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे, यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

सोलापूर जिल्ह्यात या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी प्राधान्यक्रम देवून नियोजन केले आहे. यासाठी सुरुवातीला जिल्ह्यातील सर्व गावात शिवारफेरी काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांना या अभियानाचे महत्व पटवून देवून प्रबोधन करण्यात आले. तसेच तालुकास्तरावर अधिकारी, कर्मचारी, सरपंच यांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर अधिकारी, कर्मचारी यांच्या तांत्रिक कार्यशाळा घेण्यात आल्या. याबाबतच्या शासनाच्या निकषानुसार प्राधान्यक्रमानुसार जिल्ह्यातील 312 गावांची निवड करण्यात आली.

तालुकानिहाय निवडलेल्या गावांची संख्या पुढीलप्रमाणे आहे – उत्तर सोलापूर 11, दक्षिण सोलापूर 7, अक्कलकोट 9, मोहोळ 15, माढा 46, करमाळा 39, बार्शी 33, पंढरपूर 20, सांगोला 78, मंगळवेढा 47, माळशिरस 7 या गावांसाठी 1162.59 कोटी रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला.

जिल्ह्यातील मंद्रुप येथे 26 जानेवारी 2015 रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या आराखड्यामध्ये सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, लघु पाटबंधारे (जि.प.), ग्रामीण पाणीपुरवठा विभाग (जि.प.), लघु सिंचन स्थानिक स्तर, जलसंपदा व भुजल सर्व्हेक्षण विकास यंत्रणेमार्फत विविध कामे घेण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने मंजूर कामे व निधी उपलब्ध असलेली जलसंधारणाची कामे नव्याने हाती घ्यावयाची कामे व लागणा-या आवश्यक निधीचा तपशिल तसेच अस्तित्वातील जलस्तोत्राची दुरुस्ती, गाळ काढणे व बळकटीकरण करणे आदिंवर भर देण्यात आला आहे.

आराखड्यातील कामानुसार सुमारे 307 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. ती कामे 31 मार्च पूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच ज्या कामांसाठी सन 2015-16 साठी निधी उपलब्ध आहे ती कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील या कामाचे सोशल ऑडीटही केले जाणार आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पाणलोटाची कामे घेण्यात येत आहेत. जिल्ह्यात विविध यंत्रणेमार्फत सिमेंट बंधा-याची कामे मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहेत. या सिमेंट बंधा-याच्या पाणलोट क्षेत्रात 100 टक्के कंपार्टमेंट बंडिंगची कामे घेतल्यास त्याचे पावसाळ्यानंतर दृश्य परिणाम दिसू शकतील.

या अभियानाद्वारे नजीकच्या काळात शेतीला मुबलक पाणी या जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होईल. पाण्याची पातळी वाढण्याबरोबरच शेतक-यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सोलापूर जिल्ह्यात केला जात आहे.

  • गोविंद अहंकारी
  • जिल्हा माहिती अधिकारी, सोलापूर

“दुष्काळ हटवण्याचा मूलमंत्र - जलयुक्त शिवार अभियान”

  • अनिल पाटील
  • मु.पो.वरवडे ता.माढा,जि.सोलापूर

दुष्काळ आणि महापूर या दोन्ही बाबी निसर्गातील अतिरेकी परिस्थितीचे परिणाम आहेत. ते माणसाच्या हातात नाहीत. कारण पाऊस वेळच्या वेळी व मानवाच्या गरजेनुसार येण्यासाठी आपण काहीच करु शकत नाही. अतिवृष्टी झाली की महापूर येतात. नैसर्गिक, आर्थिक आणि मानवी हानी होते. परंतु महापूर आपल्याकडे जास्त काळ थांबत नाही. दुष्काळाच मात्र तसं नाही. तो अगदी काही काळ आधीच निसर्गाच्या माध्यमातून सूचना देतो आणि खूप वेळ आपल्याकडे राहात असतो. अशा काळात आपण काहीही बदल घडवू शकत नाही अशी हतबलता निर्माण होणे म्हणजेच दुष्काळ. एक वेळ धान्याचा दुष्काळ परवडतो, कारण गरज पडली तर आपण परप्रातांतून किंवा परदेशातूनही धान्य आयात करु शकतो, पण पाणी कुठून आणणार ? शिवाय पाण्याची टंचाई इतर अनेक प्रकारच्या दुष्काळांना आमंत्रण देते. त्याची दाहकता भयावह असते हे महाराष्ट्रातील अवर्षण प्रवण भागातील दुष्काळाने होरपळणारी जनता आणि काही प्रमाणात शासनही अनुभवते आहे.

महाराष्ट्रात काही भाग असेही आहेत की, तेथे दुष्काळ पडला की पुन्हा दोन वर्षानी दुष्काळ असे दुष्टचक्र सुरु आहे. सतत तीन-चार वर्षेही वाईट असतात. दुष्काळी असतात. त्रासाची असतात. त्यावर मात करण्यासाठी प्रचंड मेहनतीची आणि इच्छाशक्तीची गरज असते. महाराष्ट्रात असे अनेक तीव्र दुष्काळ होऊन गेले आहेत. त्यातील एक दुष्काळ सतत 12 वर्षे होता. त्यावेळी येवून गेलेल्या एक विदेशी प्रवाशाने आपल्या प्रवास वर्णनात या दुष्काळाचे भयावह रुप लिहून ठेवले आहे. तो म्हणतो की, भरुच ते चोपडा या मार्गावर रस्त्याच्या कडेला मानवी मृतदेहांचे खचच्या खच पडले होते. तर रस्त्यालगतच्या कोरडया विहीरी हया मृत प्राण्यांच्या सांगाडयांनी / मृतदेहांनी भरुन गेलेल्या होत्या. सर्व वातावरणात एक प्रचंड दुर्गंधी भरुन राहिली होती आणि जे लोक जिवंत होते ते स्थलांतर करण्यासाठी धावत होते. यावरुनच आपल्या पूर्वजांना दुष्काळाने कशा पध्दतीने नागवले होते याचा अंदाज येतो.

महाराष्ट्राच्या अवर्षण प्रवण भागात दुष्काळ हा आता पाचवीलाच पुजला आहे. खरे तर थैमान हा शब्द वादळ,भूकंप,अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तींशी निगडीत आहे. परंतु महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीमुळे जनता आणि पशुधनाचे झालेले प्रचंड नुकसान, हालअपेष्टा व वेदना पाहता दुष्काळाने थैमानच घातले आहे हे म्हणणे केवळ संयुक्तिकच नव्हे तर वस्तुनिष्ठही आहे. या दुष्काळाने जनतेचे आतोनात नुकसान केले.

महाराष्ट्राची भूगर्भीय रचना व पडणारा पाऊस लक्षात घेऊन दुष्काळी पट्टयात पाण्याचे नियोजन व अधिक पावसाच्या प्रदेशात पाण्याचे नियोजन स्वतंत्रपणे करणे क्रमप्राप्त आहे. मोठे व मध्यम प्रकल्प आवश्यक आहेत तर राज्यातील नद्या एकमेकांना जोडणे ही भविष्यकाळातील मोठी गरज आहे. या कामांना प्रचंड निधी व मोठा कालावधी लागणारा आहे. या कामांना पूरक असा शाश्वत उपाय म्हणजे गावात पडणरे पाणी गावातच अडविणे व जिरवणे. या उपायाचे महत्व आणि उपयुक्तता लक्षात घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी “जलयुक्त्‍ शिवार अभियान” सुरु केले. हे अभियान दुष्काळ हटविण्यासाठी सक्षम तर आहेत पण या अभियानाने महाराष्ट्रातील परावलंबी जनतेला स्वावलंबी बनविण्यास सुरुवात केली आहे. कारण सातत्याने मागण्या करणाऱ्या जनतेने या अभियानामध्ये एका वर्षात 100 कोटी एवढी मोठी रक्कम खर्च करुन लोकसहभाग नोंदविला. शासनाचे 1300 कोटी व जनतेचे 100 कोटी अशा 1400 कोटी रुपयांच्या खर्चात 1600 कि.मी.लांबीच्या नाला खोलीकरण, सरळीकरण या कामासह हजारो बंधारे आणि पाणी अडविण्याच्या कामांची उभारणी पूर्ण केली.

राज्य शासनाने सुरु केलेला हा उपक्रम म्हणजे ग्रामीण भागातील दुष्काळी पट्टयातील जनतेला दिलेली सर्वात मोठी भेट आहे. याचे परिणाम पावसावर अवलंबून आहेत.2015 या वर्षात देशभर सरासरीपेक्षा 20 टक्के पाऊस कमी पडला. तर दुष्काळी पट्टयात विशेष:त जेथे जलयुक्त शिवार अभियान राबविले आहे तेथे याहूनही कमी पाऊस पडला तरी सुध्दा 24 टीएमसी एवढा जलसाठा निर्माण करुन त्यामधून रब्बी पिकासाठी सुमारे 15 लाख एकर क्षेत्रातील पिकासाठी निश्चित पाणी देता येईल व दुष्काळामुळे पिक वाया जाण्याचा धोका कमी करता येईल. एवढे पाणी अशा दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध आहे यावरुनच या अभियानाची क्षमता लक्षात येते.

दुष्काळी प्रदेशातील या अभियाना अंतर्गत अत्यंत चांगले काम सोलापूर जिल्हयात झाले याचे सर्व श्रेय सोलापूरचे तरुण तडफदार व कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री.तुकाराम मुंढे यांना द्यावे लागेल. महाराष्ट्रातील दुष्काळी जनतेला संजीवनी देणारे हे अभियान आपल्या जीवनातील मोठे ध्येय ठरवून राबत असल्याबद्दल मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांचे मन:पूर्वक अभिनंदन !

मात्र जलयुक्त शिवार अभियानातून निर्माण होणारे पाणी वापरण्यासाठी शाश्वत जागरुकता निर्माण करुन ती स्थापित करावी लागेल. यासाठी सुध्दा लोकसहभाग व स्थानिक रुढी- परंपरा, चाली-रिती, पिकरचना यांचा अभ्यास करुन त्याचा अवलंब करावा लागेल. यामध्ये परदेशी अथवा परप्रातांतील दिखाऊ ज्ञानाचा उपयोग होणार नाही हे नम्रपणे नमूर करावेसे वाटते.

पंढरपूर तालुका अग्रेसर

राज्यातील शेतकरी सुखी झाला पाहिजे. शेतकरी सुखी तर राज्य सुखी यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राज्यातील दुष्काळाची स्थिती कायमची दूर करण्यासाठी शासन अनेकविध योजना, उपक्रम राबवित आहे. या पैकी एक म्हणजे जलयुक्त शिवार अभियान... सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी व टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी राज्यात जलयुक्त्‍ा शिवार अभियान ही योजना राबविण्यात येत असून गावात आणि गावाच्या शिवारात पडणारे पावसाचे पाणी गावातच अडवून ते मुरविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान प्रभाविपणे राबविण्यात येत आहे. या अभियानातून दरवर्षी साधारणत: 5 हजार गावे टंचाईमुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्याप्रमाणे नियोजन आणि कार्यवाही करण्यात येत आहे.

पावसाचे पाणी जास्तीत जास्त शिवारात अडविणे, दुष्काळी भागातील खोल गेलेल्या भूजल पातळीत वाढ करणे, पाणीसाठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे, निकामी झालेल्या जलस्त्रोतांची (बंधारे, गावतलाव, पाझर तलाव, सिमेंट बंधारे) साठवण क्षमता वाढविणे, जलस्त्रोतातील लोकसहभागातून गाळ काढणे अशा प्रकारच्या कामांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे.

पंढरपूर तालुक्यात जलयुक्त शिवार अभियान ही योजना प्रभाविपणे राबविण्यात येत आहे. तालुक्यातील आढीव, खरातवाडी, खर्डी, गार्डी, फुलचिंचोली, बाभूळगाव, बार्डी, बोहाळी, भोसे, मेंढापूर, करकंब, रांझणी, रोपळे, शेटफळ आणि सिध्देवाडी या १५ गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे सुरु आहेत.

या अभियानांतर्गत तालुक्यात सुक्ष्म सिंचनाची ७१३ कामे, शेत बांधबंधिस्ती २ कामे, सलग समतल चर २ कामे, सिमेंट/माती बांधातील गाळ काढणे १ काम, नालाखोलीकरणाची ४ कामे, पाझर तलाव दुरुस्तीची ५ कामे, वृक्ष लागवडीची १०, विंधन विहीर पुनर्भरण ८५, विहीर पुनर्भरण २६२, शेती तळी १९ आणि सिमेंट कॉक्रीट नाला बांधाची २२ कामे झाली असून ही सर्व कामे शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहेत. ही कामे वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, लघुसिंचन ( जि.प.), ग्रामीण पाणी पुरवठा, लघुसिंचन जलसंधारण या विभागामार्फत करण्यात येत आहे.

पंढरपूर तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरु असलेल्या कामावर आत्तापर्यंत १२ कोटी ९१ लाख ३२ हजार इतका खर्च झाला आहे. तर लोकसहभागातून गाळ काढण्याची कामे सुरु असून गाळ काढण्याच्या कामांमुळे सुमारे ९७ हेक्टर क्षेत्र तयार झाले आहे.

पावसाचा लहरीपणा, दुष्काळाचे चटके सहन करत येणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी येथील शेतकरी झगडत/प्रयत्न करत आहे. त्याच्या प्रयत्नाला शासनाने जलयुक्त शिवार अभियानाने मोलाची साथ आणि मदत मिळाली आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध निर्माण होवून राज्यातील दुष्काळी परिस्थिती हटविण्यास मदत होणार आहे.

  • एकनाथ पोवार
  • माहिती सहायक
  • उप-माहिती कार्यालय,पंढरपूर.

सोलापूर जिल्ह्याची आघाडी

राज्यात सर्वांसाठी पाणी …. टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 हे महत्वाकांक्षी अभियान राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. याअंतर्गत दुष्काळ निर्मूलनासाठी दरवर्षी 5 हजार गावांची निवड करुन जलयुक्त करण्याचे ठरविण्यात आले. या अभियानात शासकीय यंत्रणेबरोबरच लोकसहभाग वाढविण्यावर शासनाचा भर आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सुरवातीपासूनच विशेष लक्ष देवून नियोजन केले. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात हे अभियान अतिशय यशस्वी राबविले जात आहे.

या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 280 गावाची शासनाच्या निकषानुसार पहिल्या वर्षी निवड करण्यात आली. यानुसार गाव आराखडा तयार करुन ग्रामसभेची मंजूरी घेण्यात आली. या अंतर्गत सुरु केलेली 2014-15 ची कामे मार्च अखेर पूर्ण करावीत. तर 2015-16 ची कामे 31 मे पर्यंत पावसाळा सुरु होण्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरिवण्यात आले. यासाठी जिल्हाधिकारी मुंढे यांनी विविध बैठका, कार्यशाळा घेवून कामाचा सातत्याने आढावा घेतल्यामुळे या कामास चांगली गती आली आहे.

या अभियानांतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत कंपार्टमेंट बंडिंगची 787 कामे सुरु करण्यात आली त्यापैकी 572 कामे पूर्ण झाली असून 215 कामे प्रगतीपथावर आहेत. या अंतर्गत 38.000 हे. कंपार्टमेंट बंडिंग करण्यात आले असून यासाठी 1687.11 लाख रुपये खर्च झाला आहे. सलग समतल चराची 51 कामे सुरु करण्यात आली. त्यातील 36 कामे पूर्ण झाली तर 15 कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 147 हेक्टर क्षेत्रात सलग समतल चराची कामे झाली आहेत. या कामासाठी 35.95 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. तर खोल सलग समपातळी चराची 125 हेक्टर क्षेत्रावर 5 कामे हाती घेवून पूर्ण करण्यात आली. या कामासाठीही 32.19 लाख रुपये खर्च आला आहे.

तसेच माती नाला बांधाची 208 कामे असून 115 कामे पूर्ण झाली आहेत, 93 कामे प्रगतीपथावर आहेत या कामासाठी 479 लाख रुपये खर्च झाला आहे. शेततळ्याची 308 कामे हाती घेवुन 248 कामे पूर्ण करण्यात आली तर 60 कामे प्रगतीपथावर आहेत. या कामासाठी 335.48 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. त्याच्रपमाणे साखळी सिमेंट बंधा-याची 345 कामे घेण्यात आली. त्यापैकी 114 कामे पूर्ण झाली असून 231 कामे प्रगतीपथावर आहेत. आतापर्यंत या कामावर 1035.4 लाख रुपये खर्च झालेला आहे. नाला खोलीकरणे व सरळीकरणाची 29 कामे घेण्यात आली. त्यातील 17 कामे पूर्ण झाली आहेत. तर 12 कामे प्रगतीपथावर आहेत. या कामासाठी 313.26 लाख रुपये खर्च झाला आहे.

पाझर तलाव दुरुस्तीची 8 कामे घेण्यात आली त्यातील 2 कामे पूर्ण झाली. तर 6 कामे प्रगतीत आहेत. याकरिता 375.6 लाख रुपये खर्च करण्यात आलेला आहे. तर पाझर तलाव दुरुस्तीच्या 16 कामापैकी 11 कामे पूर्ण तर 4 कामे प्रगतीपथावर आहेत. यासाठी 49.7 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.

के.टी. वेअर दुरुस्तीच्या 7 कामापैकी 5 कामे पूर्ण तर 2 कामे प्रगतीत आहे. या कामाकरिता 40.65 लाख रुपये खर्च झाला आहे. कालवा दुरुस्तीची 2 कामापैकी 1 पूर्ण झाले असून 1 काम प्रगतीत आहे. या कामासाठी 14.87 लाख रुपये खर्च झालेला आहे. लघुपाटबंधारे दुरुस्ती 3 कामे हाती घेवून ती पूर्ण करण्यात आली. या कामांसाठी 121.21 लाख रुपये खर्च झाला आहे. तसेच अनघड दगडाचे बांधाची 229 कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी 6 कामे पूर्ण असून 223 कामे प्रगतीत आहे. आतापर्यंत या कामांवर 16.82 लाख रुपये खर्च झाला आहे. अर्दन स्ट्रक्चरची 78 कामांपैकी 3 कामे पूर्ण झाली तर 75 कामे प्रगतीत आहेत.

याबरोबरच वृक्ष लागवडीची 109 कामे हाती घेण्यात आली. त्यापैकी 69 कामे पूर्ण झाली असून 40 कामे प्रगतीपथावर आहेत. या कामावर आतापर्यंत 212.82 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. ठिबक सिंचनाची 2876 कामांपैकी 2853 कामे पूर्ण झाली आहेत. तर 23 कामे प्रगतीपथावर आहेत. या कामासाठी आतापर्यंत 787.91 लाख रुपये खर्च झाला आहे. तर तुषार सिंचनाची 106 कामांपैकी 88 कामे पूर्ण झाली असून 18 कामे प्रगतीत आहेत. या कामावर आतापर्यंत 18 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. या कामाबरोबरच पाणी वाटप संस्था बळकट करण्याकडेही विशेष लक्ष देण्यात आले. 68 कामांपैकी 28 कामे पूर्ण तर 40 कामे प्रगतीपथावर आहेत. या करिता 987 लाख रुपये खर्च झालेला आहे. सुक्ष्म सिंचन मल्चिंगच्या 125 कामांपैकी 100 कामे पूर्ण झाली तर 25 कामे प्रगतीत आहेत. याकामावर आतापर्यंत 28.13 लाख रुपये खर्च झालेला आहे.

विहिर पुर्नभरण व लोकसहभाग : जिल्ह्यात विहिर पुर्नभरणाची तसेच विविध प्रकल्पातील तलावातील गाळ काढण्याची कामे मोठ्या प्रमाणात लोकसभागाद्वारे सुरु आहेत. या अभियानामधील गावातील 5982 विहिर पुर्नभरणाची कामे पूर्ण झाली आहेत तर 3282 कामे प्रगतीत आहेत. या अभियाना व्यतिरिक्त गावातही 3667 विहिर पुर्नभरणाची कामे पूर्ण झाली तर 4234 कामे प्रगतीत आहेत. अशी एकूण 9649 विहिरी पूर्नभरणाची कामे पूर्ण असून 7517 कामे प्रगतीवर आहेत. अशी 17166 कामे हाती घेवून या कामात जिल्ह्याने आघाडी घेतली आहे.

जिल्ह्यातील विविध धरणे, सिंचन प्रकल्प, पाझर तलाव, अन्य छोट्या तलावात मागील कांही वर्षापासून मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. या अभियानाद्वारे लोकसभागाद्वारे गाळ काढण्याचा उपक्रम अतिशय गतमीमानतेने राबविला जात आहे. आतापर्यंत सर्व प्रकल्पातून 16 लाख 76 हजार 859 क्यूबिक मिटर एवढ्या मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्यात आला आहे. याचा जिल्ह्यातील 3643 शेतक-यांना लाभ झाला आहे. यामुळे सुमारे 1117 हेक्टर क्षेत्र शेत गाळामुळे नव्याने तयार झाले आहे. लोकसहभागाद्वारे या कामासाठी 392 जेसीबी, 1500 ट्रक / ट्रॅक्टर व नागरिकांनी श्रमदानाने अंदाजे 1257.64 लाख इतक्या रकमेची कामे झाली आहेत. या कामामुळे 5428.22 टीसीएम एवढा पाणी साठा वाढणार आहे.

राज्य शासनाच्या महत्वपूर्ण अभियानामध्ये सोलापूर जिल्ह्याने नियोजनबध्द काम करुन आघाडी घेतली आहे. आणखी सुरु असलेली कामे पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्याचे विकासाचे चित्र बदलून जाईल. शासनाचे हे अभियान राबविण्याचे दृश्य परिणाम सोलापूर जिल्ह्यात निश्चितपणे पहावयास मिळतील.

  • गोविंद श. अहंकारी
  • जिल्हा माहिती अधिकारी
  • सोलापूर
त्यावेळी अव्वल प्ले विराम