ठाणे

जलयुक्त शिवार अभियान : यशोगाथा

एकेकाळचा गाळाने भरलेला खरडचा बंधारा झाला पुनरुज्जीवित; शेतकऱ्यांनी केली भाजीपाला लागवडीची तयारी

जलयुक्त शिवार अभियानात अंबरनाथ तालुक्यातील खरड गावी लोकसहभागातून सिमेंट बंधाऱ्यातील गाळ काढल्याने परिसरातील ३ हेक्टर जमीन सिंचित झाली असून शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीचे नियोजन  सुरु केले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ श्रीकांत शिंदे,जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर , मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत याठिकाणी नुकतेच जलपूजन झाले.

जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने हे गाळ काढण्याचे काम केले असून अनेक वर्षांपासूनचा सुमारे ५२०० घनमीटर  इतका गाळ काढल्याने यंदाच्या पावसाळ्यात चांगले पाणी साठून आजूबाजूचे शेतकरी उत्साहाने भाजीपाला व इतर पिकांची लागवड करीत आहेत. पूर्वी इथे ४३०० घ.मी. इतका पाणीसाठा कसाबसा व्हायचा. गाळ काढल्याने आणखी वाढीव ५२०० घ.मी. पाणीसाठा होणार आहे. हा बंधारा २००३-२००४ या वर्षी बांधला होता.

खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे प्रयत्न

खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी या बंधाऱ्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढाकार घेतला होता.त्यांनी वारंवार या ठिकाणी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना सुचना केल्या होत्या एवढेच नव्हे तर बंधारा स्वच्छ करण्यासाठी आवश्यक ती साधन सामुग्रीही उपलब्ध करून दिली होती.   जिल्हाधिकारी डॉ कल्याणकर यांनी या अभियानात प्रामुख्याने प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणच्या तलावांतील गाळ काढण्याचे काम हाती घेण्याच्या सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे उल्हासनगर उपविभागीय अधिकारी यांनी खरडचे हे काम कमी कालावधीत पूर्ण केले. यासाठी १ पोकलेन, एक जेसीबी, तीन डंपर लावण्यात आले होते.

या बंधाऱ्यातील पाणीसाठा आता ५ टीसीएमने वाढणार असून भूगर्भातील पाण्याची पातळीही वाढणार आहे. शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणमध्ये डीझेल इंजिनाचा ५० टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात येणार असून रब्बी हंगामात याठिकाणच्या भाजीपाला क्षेत्रात आणखी वाढ होईल अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी महावीर जंगटे यांनी दिली.

जलयुक्त शिवार कामांमुळे
भूगर्भातील पाणी पातळीत वाढण्यास सुरुवात

भूजल सर्व्हेक्षणचा अहवाल

ठाणे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार कामांमुळे काही तालुक्यातील भूगर्भातील पाणी पातळीत समाधानकारक वाढ होत असल्याचे त्रयस्थ संस्थेने केलेल्या मूल्यमापनानुसार दिसते. विहिरींमधील पाणी वाढले असून याचा दीर्घकालीन फायदा परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांना होणार आहे.

अंबरनाथ तालुक्यातील काराव आणि शहापूर तालुक्यातील वरसकोळ येथील निरीक्षण विहिरींचा या संस्थेने अभ्यास केला. काराव मध्ये गेल्या वर्षी म्हणजे २०१५ साली जानेवारी, मार्च, मे आणि ऑक्टोबर मध्ये असलेले  विहिरीचे पाणी आणि या वर्षी २०१६ मधील जानेवारी, मार्च आणि मे महिन्यातील याच विहिरीतले पाणी याची तुलना करता सध्या पाण्याची पातळी वाढलेली दिसली . जानेवारी २०१५ मध्ये ४.९० मीटर असलेली पटली ५.४० मीटर इतकी झाली.

वरस्कोलमध्ये जानेवारी २०१५ मध्ये विहिरीतील पाणी पातळी २.५० मीटर्स होती ती आता ४.४० मीटर इतकी झाली आहे.

तालुकानिहाय सरासरी पाणी पातळीचा तपशील पहिला तरी हे लक्षात येईल की, जलयुक्त शिवार कामांचा परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. कंसातील आकडेवारी २०१५ वर्षीची आहे. अंबरनाथ ५.०३ मीटर ( २.७१), भिवंडी ४.४३ मीटर (३.३७),कल्याण २.३३ मीटर ( १.५०), मुरबाड ६.०६ मीटर ( १.९१), शहापूर ४.५१ मीटर ( १.९१)

या तालुक्यातील  निरीक्षण विहिरींच्या सरासरी पाणी पातळीचा विचार करता २०१६ मध्ये भिवंडी तालुक्यात पाणी पातळीत वाढ झाली असल्याचे त्याचप्रमाणे अंबरनाथ, मुरबाड, व शहापूर तालुक्यात यंदा जानेवारी आणि मार्च मध्ये वाढ झाल्याचे दिसते असा प्राथमिक अहवाल आहे.

वाकळण : एकेकाळचा रखरखीत भाग आता भाजीपाल्याने फुलला

कल्याण नजीकचे वाकळण गांव आणि परिसरातील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी अवघ्या ३ महिन्यात झालेले प्रयत्न म्हणजे राजकीय इच्छाशक्ती, आणि कल्पकतेचे उत्तम उदाहरण आहे असे म्हटले तर गैरलागू होणार नाही. काय बदल झालाय वाकळण परिसरात हे जाणून घेण्याची तुमची इच्छा असेल ना?

कल्याण-डोंबिवली शहरांपासून 15 किलोमीटरवर असलेल्या गावांचा पाणीपुरवठ्याचा गंभीर आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात या परिसरात शेतीही केली जाते. पावसाळी पाण्यावर ही शेती होते. डिसेंबरनंतर तेथे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते. वाकळण गावात सुमारे 83 एकर जागेवर तलाव आहे;मात्र यातील काही भागांत शेती होते. काही भागांत जमिनी उंच आहेत. त्यामुळे पाणी साठण्याचे प्रमाण कमी आहे. ही बाब सरपंच श्री. अरुण भोईर यांनी एकदा कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली.

टंचाईच्या झळा लागतील अशी चिन्हे होतीच. जलयुक्त शिवारला प्राधान्य द्यायचे असे सरकारी पातळीवर ठरले होते. अशावेळी केवळ शासन करेल आणि लोकांनी फक्त पहात राहायचे असे न करता लोकसहभागातून या परिसराचा कायापालट करण्याचे पालकमंत्र्यांनी ठरविले. त्या दृष्टीने जूनमध्ये ते स्वत: या गावांत दाखल झाले.

विस्तार अधिकाऱ्यांनी सदर तलावाची व परिसराची कागदपत्रे व नकाशा पालकमंत्र्यांना दाखविला. या तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा होतो, परंतु काही भाग उंचसखल असल्यामुळे पूर्ण तलावात पाणी न भरता मध्ये मध्ये पाण्याचा साठा कमी प्रमाणात होतो. त्यामुळे तातडीने पोकलेन पद्धतीचे खोदाई मशीन मागवून हा भाग खोदण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आणि कामाला सुरुवात झाली.

खोदकाम जास्तीतजास्त केल्यास पावसाळ्यात त्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा होऊ शकतो,या पाण्याचा विनियोग शेती व्यवसायासाठी होऊ शकतो तसेच या तलावातील पाण्याचे आर.ओ. पद्धतीने शुद्धीकरण केल्यास परिसरातील गावकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटण्यास मदत होईल असे म्हणून, हे काम खंड न पडता व्हावे असे आदेशही त्यांनी दिले. पावसाळा नजीक असल्याने तलावात पाणी साठण्याच्या दृष्टीने तातडीने हालचाली सुरू झाल्या.

आजमितीस येथील जमिनीचा सपाटीकरण आणि तलावात साठलेला गाळ काढण्यात आला आहे. तलावाचे क्षेत्र मोठे झाले आहे. त्यामुळेच यंदा तलावातील पाणीसाठा वाढला आहे. त्यातून तेथील ग्रामस्थांनी २५ एकर क्षेत्रावर भाजीपाल्याचे पीक घेतले आहे. हा तलाव 83 एकर जागेवर आहे; मात्र सध्या त्यातील काही जागेचा वापर शेतीसाठी होतो. तलावाच्या विकासामुळे सभोवतालच्या गावांनाही पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही. प्राधान्याने या कामाकडे लक्ष द्यावे, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. परिसरात एखादा बगिचाही विकसित केला जाऊ शकते. त्यामुळे पर्यटनालाही वाव मिळण्याची शक्‍यता आहे.

जलयुक्त शिवारच्या कामांमुळे
ठाणे जिल्ह्यात टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात शक्य

ठाणे जिल्ह्यातील २६ गावांची निवड गेल्या वर्षी म्हणजे २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवारच्या कामांसाठी झाली आणि आत्तापर्यंत २६.७४ कोटी रुपये खर्चून २७९२ कामे पूर्ण झाली आहेत तसेच १३ कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांमुळे निश्चितच ठाणे जिल्ह्यातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास त्याचप्रमाणे टंचाईपरिस्थितीवर मात करणे शक्य होणार आहे.  आतापर्यंत ११ हजार २९० टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला असून ४ हजार ३१० हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. ४.३३ कोटी रुपयांचा विशेष निधी देखील आपण यासाठी खर्च केला आहे.

यंदाच्या वर्षी  म्हणजे २०१६-१७ मध्ये  १८ गावे आपण निवडली आहेत आणि  १३०१ कामांना सुरुवात झाली आहे. ३२ कामे पूर्णही झाली आहेत. २२.१५ कोटी रुपयांच्या तरतुदीतून १३०१ कामे केली जाणार आहेत. कृषी विभ्गाची २३ आणि ल.पा. जिप ८ कामे करणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ८७ लाख रुपये विशेष निधी म्हणून मिळणार आहे तर सीएसआरपोटी १९.१२ लाख रुपये प्राप्त झाले आहेत.

केवळ भात शेतीवर अवलंबून न राहता आम्ही विविध प्रयोग करायचे ठरविले आहे. जिल्ह्य़ात यंदा  भात पिकाचे उत्पादन प्रति हेक्टर २५.५० किलोपर्यंत वाढविण्यासाठी काही स्थानिक वाणांची लागवड करण्यात येणार आहे. यासोबतच कडधान्य पिके व भाजीपाला घेण्यावरही भर असेल. सेंद्रिय शेती वाढविण्यासाठी ५० शेतकऱ्यांचा गट तयार करणे, मोहापासून तेल तसेच मोगरा शेतीसाठी लागवड अशी काही उद्दिष्टे आम्ही ठेवली आहेत. हे सर्व करणे तेव्हाच शक्य होईल जेव्हा पाण्याच्या बाबतीत आम्ही स्वयंपूर्ण होऊत. या वर्षी आम्ही जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक नियोजनबध्दरीतीने जलयुक्त शिवारचे काम पूर्ण करूत असा मला विशास आहे

आदिवासी शेतकऱ्यांना फायदा
तलावातील गाळ शेतात टाकल्याने जमीन सुपीक

बळीराम जैतू उघडे हे कल्याण तालुक्यातील कांबा येथील स्थानिक भूमिपुत्र आहेत . आदिवासी समाजातील आहेत. ४५ वर्षांच्या बळीराम यांना या पूर्वी जवळपास प्रत्येक उन्हाळ्यात भीषण पाणी ट्ंचाईचा सामना करावा लागत होता, कांबा गावाची लोकसंख्या 1500 आहे.

बळीराम म्हणाले की, कांबा येथील तलावातील गाळ काढल्यामुळे पहिला फायदा आम्हाला असा झाला की, तलावातील गाळाची माती शेतात टाकल्याने शेत जमिनीचा कस वाढण्यास मदत होणार आहे. शिवाय या गाळणे भरलेल्या तलावालाही आता मोकळा श्वास मिळणार आहे . पावसाळ्यातील भातशेतीचे उत्पन्न घेतल्या नंतर आम्ही आदिवासी बांधव काकडी , खरबूज ,दुधी , भेंडी , वांगी तसेच हरभरे ,वाल ,तुरीचेही भरघोस उत्पादन घेणार आहोत. आमचा पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न कायम स्वरूपी संपुष्टात आला आहे. जनावरांनाही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही. जिल्हा प्रशासनाने लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्याचा हा जो उपक्रम केला त्यमुळे आमचे रोजगारासाठीचे भटकंतीचे दिवसही थांबणार आहेत ...

ठाणे जिल्ह्यातील ७ तालुक्यांत यंदा उन्हाळ्यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. गेली वर्षभर जलयुक्त शिवाराची कामे सुरु होती. गावकरी देखील उत्साहाने आपला सहभाग देत होते. आता या भागातील गावांमधील शेतकरी जलयुक्त शिवार अभियानाबद्दल भरभरून बोलत आहेत.

तसा ठाणे जिल्हा हा भात पिकाचा. पण शेतकरी आता नवनवीन प्रयोग करण्याच्या मनस्थितीत आहेत. भाजीपाला मोठ्या प्रमाणावर कसा घेता येईल याचा विचार सुरु आहे. गेली काही वर्षे टंचाई परिस्थितीमुळे शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना यंदा जलयुक्त शिवार अभियानामुळे भरघोस उत्पादन मिळण्याची आशा आहे. त्यामुळे या अभियानाबद्दल शेतकरी राज्य शासनाचे आभार मानताना दिसले. पुरेसे पाणी मिळाल्यामुळे खरीप हंगामात समाधानकारक उत्पन्न मिळाल्याने शेतकऱ्यांचा उत्साह वाढला असून शिवार फुलविण्याच्या तयारीला ते लागले आहे. त्यांना आता पाणी टंचाईची अथवा नापिकीची कोणतीही चिंता सतावत नसल्याचे यावेळी जाणवले.

लोकसहभागातून जलयुक्त शिवाराचे यश
विहिगाव येथे २ कोटी लिटर क्षमतेच्या बंधा-यामुळे
१५० एकर शेती ओलिताखाली

कसारा पासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिगाव या आदिवासी गावात लोकसहभागातुन निर्माण झालेल्या दोन सिमेंट काँक्रीटच्या बंधाऱ्यामुळे सुमारे 2 कोटी लिटर्स पाणी साठणार असून गावातील 150 एकर पेक्षा अधिक शेती ओलिताखाली येणार आहे. लोकसहभाग असेल तर शासनाचां एखादा महत्वाकांक्षी प्रकल्प कसा यशस्वी होऊ शकतो याचे हे उत्तम उदाहारण आहे.

शहापूर तालुक्यातील मध्य वैतरणा जलाशयाला लागून वसलेल्या विहिगाव या गावाला वर्षातून सहा महिने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. या गावातील दुष्काळाच्या समस्येवर मात करण्यासाठी डोंबिवलीतील विवेकानंद सेवा मंडळ, भारत विकास परिषद आणि टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या संस्था ग्रामस्थांच्या मदतीने पुढे सरसावल्या. आणि पाहता पाहता आज विहिगावचा दुष्काळाचा प्रश्न सुटण्यास मदत होते आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच या योजनेमुळे दुबार शेती शक्य होणार असून, मत्स्य शेतीसुद्धा घेतली जाणार आहे.

विहिगावमधील रहिवाशांना रोज दोन किलोमीटर लांबून पायपीट करून पाणी आणावे लागते. दरवर्षी मे महिन्यात तर गावातल्या विहिरींना पाणीच उपलब्ध होत नाही. डोंगर उतारामुळे या भागातील पावसाचे पाणी वाहून जाते. त्यामुळे पाण्याशिवाय गावकऱ्यांना दिवस काढावे लागतात. विहिगावमध्ये सामाजिक उपक्रम राबवताना विवेकानंद सेवा मंडळाच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने समस्या सोडविण्याचा निर्णय घेतला.

यासाठी गावातील पडक्या विहिरी आणि बंधारे यांचा अभ्यास करून जलतज्ज्ञ डॉ उमेश मुंडल्ये यांना बोलावून जलशक्ती अभियान सुरू करण्यात आले. गावातील विहिरी आणि बंधारे यांची स्थिती सुधारण्यासाठी विवेकानंद सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि त्यातूनच हा पाण्याचा प्रश्न सोडविण्यात यश आले.

भारत विकास परिषदेतर्फे ग्रामविकासातील विविध आयामांवर कार्य केले जाते व जलशक्ति अभियानातील कार्य हे पथदर्शक ठरेल, असा विश्वास परिषदेचे प्रादेशिक सचिव सुधीर जोगळेकर यांनी व्यक्त केला. गणेशोत्सवात दुष्काळी गावांसाठी लोकांनी दिलेला निधी आम्ही जलशक्तिसाठी सुपूर्द केला, अशी माहिती टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सवाचे श्री नंदन दातार यांनी दिली.

"जलशक्ती अभियानाचा तिसरा टप्पा पुढील वर्षी राबविण्यात येणार असल्याचे विवेकानंद सेवा मंडळाने ठरविले आहे. जोपर्यंत विहिगाव जलयुक्त होऊन स्वयंपूर्ण होत नाही, तोपर्यंत हे कार्य चालूच ठेवू," असा विश्वास विवेकानंद सेवा मंडळाचे अध्यक्ष केतन बोंद्रे यांनी व्यक्त केला.

जलशक्ती अभियानाच्या पहिल्या टप्प्यात २०१५मध्ये दोन विहिरी आणि बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली होती आणि या बंधाऱ्यामुळे यंदा मे महिन्यातही विहिरी पाण्याने भरलेल्या दिसून आल्या. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये वतीने गावातील दोन बंधाऱ्यांची डागडुजी करण्यात आली व एक गॅबियन पध्दतीचा बंधारा बांधण्यात आला. त्याच बरोबर येथील पात्रातील गाळ काढण्यात आला.

“सध्याच्या शासनाचा भर लोकसहभागावर आहे आणि या संस्थांनी राबवलेले संपुर्ण जलशक्ति अभियान हे पुर्णतः लोकसहभागावरच आधारित आहे त्यामुळे या संस्था विशेष अभिनंदनास पात्र आहेत," असे उदगार जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी लोकार्पणाच्या वेळी बोलताना काढले.

लोकसहभागातून गाळ काढलेले १६ तलाव पाण्याने भरले;
परिसरातील शेतकरी, गावांना मोठा फायदा

१३ लाख घनफुटापेक्षा जास्त वाढीव पाणी क्षमता

जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन विविध तालुक्यातील १६ तलावांमधील गाळ लोकसहभागाने काढण्याचे काम केले होते. यंदाच्या पावसाळ्यात त्याचे चांगले परिणाम दिसून येत असून मोठ्या प्रमाणावर पाणी साठा निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. अनेक वर्षांपासून या तलावांमध्ये गाळ साचला होता, काहींचे खोलीकरण करणेही गरजेचे होते हे काम झाल्याने पुरेसे पाणी साठून आता वर्षभर या परिसरातील शेतकरी, गावकरी यांना निश्चितच फायदा होत आहे. १३ लाख घनफुटापेक्षा जास्त वाढीव पाणी क्षमता यातून निर्माण होत आहे.

जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर महेंद्र कल्याणकर यांनी जलयुक्त शिवार योजनेला प्राधान्य देऊन कृषी, जिल्हा परिषद, लघु पाटबंधारे वन विभाग यांना ही कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या मे महिन्यापासून या कामास प्रारंभ. महिन्याभरात जिल्ह्यातील विविध ५ तालुक्यातील १६ तलावांचा गाळ काढून पूर्ण झाला.

भिवंडी तालुक्यातील पहारे, गाणे, बोरपाडा, कारिवली, खारबाव, शेलार त्याचप्रमाणे कल्याण तालुक्यात आणे, कांबा; मुरबाड तालुक्यात बागेश्वरी तलाव, तळवली-बारागाव, मासले– बेलपाडा, खेडले- तळवली; अंबरनाथ तालुक्यात चोण आणि शहापूर तालुयात ढेंगणमाळ, उंबरमाळी, दहीगाव अशा ठिकाणी तलावांमधून गाळ काढण्याचे काम झाले.

तलावांमधून काढण्यात आलेला गाळ आणि वाढीव पाणी क्षमता पुढीलप्रमाणे आहे

पहारे ४६० ब्रास ( ४ लाख ६० हजार घनफूट पाणीसाठा ), बोरपाडा १५० ब्रास ( १८२७० घनफूट) गाणे ८०० ब्रास ( ३७ हजार ४४० घनफूट), कारिवली ७५ ब्रास ( ९१४० घनफूट), खारबाव ३०० ब्रास ( ३६५४० घनफूट), शेलार १२५ ब्रास ( १५ हजार १२० घनफूट) आणे ३१० ब्रास ( ३१ हजार), कांबा ७२० ब्रास ( ७२ हजार), बागेश्वरी तलाव ८३०० ब्रास ( ८३००० घनफूट), तळवली-बारागाव ९० ब्रास ( ९ हजार), मासले– बेलपाडा ४५ ब्रास ( ४५०० घनफूट) खेडले १३० ब्रास ( १३००० घनफूट) चोण २६५० ब्रास ( २ लाख ७० हजार), ढेंगणमाळ १२० ब्रास ( १२हजार घनफूट) उंबरमाळी १०० ब्रास ( २० हजार) दहीगाव १६५० ब्रास( १ लाख ५० हजार)

नागरिकांचा लोकसहभाग, जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न यामुळे पावसाळ्यात पाणीसाठ्यात होणाऱ्या वाढीमुळे आसपासच्या शेतीलाही याचा चांगला उपयोग होणार आहे. ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. वृक्षारोपण तसेच जल व मृद संधारणाच्या कामात गावातील नागरीकांनी पुढाकार घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

टंचाईग्रस्त कुडशेत गावात फूलला भाजीपाला

ग्रामपंचायत मळेगावमध्ये मळेगावशिवाय नारायणगाव,कुल्हे व कुडशेत ही ३ महसूली गावे येतात त्यापैकी कुडशेत हे ४७८ लोकसंख्येचे असून जवळपास संपूर्ण आदिवासी अशी ही लोकवस्ती दुर्गम भागात डोंगर पठारावर वसलेली आहे. हे गाव पूर्णपणे पठारावर असल्यामुळे यापूर्वी गावाला भीषण पाणीटंचाई जाणवत होती तसेच गावाला मुख्य रस्त्यापासुन जोडणारा रस्ता जंगलातून जाणार घाटरस्ता असल्यामुळे वहातूकीसाठीही योग्य नव्हता. साहजिकच या ठिकाणी टँकरने देखील पाणीपूरवठा करता येणे शक्य होत नव्हते त्यामुळे ग्रामस्थांना नाईलाजाने गावापासून खालील भागात असणारे सुमारे ३ कि.मी.अंतरावरील जांभा धरणाच्या साठवण क्षेत्रातून डोक्यावर पाणी वाहून आणावे लागत होते. निकषात बसत नसल्याने पाणी पुरवठा योजना सुध्दा होत नव्हती.

गावाला दळणवळणाची सुविधा नाही तसेच दरवर्षी भासणारी भिषण पाणी टंचाई अशा दुहेरी अडचणींना गावातील नागरिकांना सामोरे जावे लागत होते .गावासाठी रस्ता नसल्यामुळे विंधण विहिर खोदून हातपंप देखील बसविणे शक्य झाले नाही त्यामुळे उपलब्ध असलेल्या 3 सार्वजनीक विहिरींवर पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून राहवे लागते सदरच्या विहिरीही मार्च-एप्रिल महिन्यात आटत असत. गाव पठारावर असल्याने भुगर्भातील पाण्याची पातळी खुपच खोलवर होती त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी गावाजवळ पाणीसाठा निर्माण होणे आवश्यक होते. ठाणे जिल्हा परिषदच्या लघुपाटबंधारे विभागातील अभियंते व कुडशेतचे ग्रामस्थ यांची चर्चा बऱ्याचदा व्हायची. गावाशेजारुन वाहणा-या नाल्याला जागोजागी बंधारे बांधून पावसाळयात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा साठा निर्माण केल्यास गावाच्या पाणीटंचाईवर उपाययोजना निघू शकेल असे दिसून आले.

सुरुवातीला ग्रामस्थांच्या सहकार्याने वनराई बंधारे बांधून पाणी अडविण्यात आले त्यामुळे पाणी टंचाईचा कालावधी कमी झाला. तदनंतर लघुपाटबंधारे विभागाने 2010 पासून दरवर्षी 1 कायमस्वरुपी काँक्रीट बंधारा बांधायला सुरुवात केली. यात पाण्याचा चांगल्या प्रमाणात साठा होवू लागला. 2014 पर्यंत गावात 5 बंधारे बांधून त्यात चांगला पाणीसाठा झाला आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न काही अंशी तरी सुटला.

पंधरा एकर क्षेत्र सिंचनाखाली

2015 मध्ये मात्र महत्वाकांक्षी अशा जलयुक्त शिवार योजनेत या गावाचा समावेश झाला लघुपाटबंधारे विभागाकडून नवीन 2 बंधारे, एका बंधाऱ्याची दुरुस्ती व साठवण क्षमता वाढविणे ही कामे तसेच वनविभागाकडून 3 नवीन बंधारे आणि कृषी विभागाकडून शेती सुधारणा अशा विविध कामांचा समावेश करण्यात आला. जून 2015 अखेर लघुपाटबंधारे विभागाकडील प्रस्तावीत कामे पूर्ण झाली परिणामत: पावसाळयात मोठया प्रमाणावर पाण्याचा साठा होऊन जवळपास 15 एकर क्षेत्रावर शेतक-यांनी सिंचनाचा लाभ घेतला होता.

११० सघमी पाणीसाठा

सदयस्थितीत जलयुक्तची सर्व कामेही पूर्ण झाली असून त्यामुळे पाण्याच्या साठयात वाढ झाली आहे. आता कुडशेत गावात एकूण 10 बंधा-यांची कामे पूर्ण झाली असून त्यात 110 स.घ.मी.पेक्षा अधिक पाणीसाठा निर्माण झालेला आहे. त्यामुळे सदरचे गाव पूर्णपणे टंचाईमुक्त झाले असून 25 ते 30 एकर क्षेत्र सिंचनाखाली येवू शकणार आहे. आदिवासी शेतकऱ्यांनी गावांत ठिकठिकाणी भाजीपाला घ्यायला सुरुवात केली आहे त्यामुळे उदारनिर्वाहासाठी उत्पन्नाचे चांगले साधन निर्माण झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरणारे ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्धतेबरोबरच काही अंशी सिंचनाचा लाभ होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान आहे.

पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी कुडशेतसारखी उदाहरणे जिल्ह्यात आणखी निर्माण व्हावीत म्हणून काही ठोस पाऊले उचलली आहेत. येणाऱ्या वर्षात जलयुक्त शिवारच्या गावांमध्ये जलक्रांती आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही वाटतोय.

काराव गावाची जल यश कथा
कोरडवाहू जमिनीवर फळबागा, मत्स्यपालन

योग्य पद्धतीने जलसंधारण केले तर भूजल पातळी उंचावून विहिरी अथवा तळ्यांतून मुबलक पाणीपुरवठा होतो. अंबरनाथ तालुक्यातील काराव गावातले शेतकरी आणि ग्रामस्थ याचा अनुभव घेत आहेत. जलयुक्त शिवार अभियानासाठी अंबरनाथ तालुक्यातील काराव गावाची निवड करण्यात आली आणि शेततळी, सिमेंट नाला बांध दुरुस्ती, जुनी भात शेती दुरुस्ती, वनराई बंधारे, मजगी, सीसीटी, माती नाला बांध अशी कामे सुरु झाली. आजमितीस ४१.३३ हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण होत असून ५६ टीसीएम इतका पाणीसाठा वाढणार आहे.

वांगणीजवळ असलेल्या आणि कोरडवाहू शेतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या गावात हा बदल कसा झाला? शासनाने तर या अभियानासाठी गावाची निवड केली होतीच पण महत्वाचे होते ते शेतकऱ्यांनी दाखविलेली इच्छाशक्ती.

गावातील एक शेतकरी भगवान बनोटे यांनी शेतात शेततळे खोदले. कृषी विभागानेबनोटे यांना चाळीस हजारांचे अनुदान दिले होते. इतरत्र दोन-तीनशे मीटर खोल जाऊनही पाणी लागत नसताना त्यांच्या शेततळ्याला केवळ एक मीटरवर पाणी लागले.

२ हजार मिमी सरासरी पर्जन्यमान असलेल्या या गावाची एकूण पाण्याची आवश्यकता आहे २०७.९० टीसीएम. पिकांसाठी लागते १६९.४० टीसीएम आणि पिण्यासाठी लागते ३८.५० टीसीएम. माणसे, जनावरे मिळून संख्या आहे २ हजार ५७२.

अभियानातले गाव असल्याने कृषी विभाग, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे, पाणी पुरवठा, वन विभाग या यंत्रणांनी आपापली जबाबदारी उचलली. कृषी विभागाने केलेल्या ८५ कामांमधून ३७.२२ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला असून १६.६३ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.

लघु पाटबंधारे विभागाच्या ३ कामांमधून २.७० हेक्टर सिंचन क्षमता तर वन विभागाच्या ६ कामांमधून २२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.

रब्बी लागवड शक्य

प्रचलित पिक पद्धतीनुसार या ठिकाणी खरीपात भात घेतला जातो मात्र रब्बी हंगाम कोरडाच असतो. विशेष म्हणजे या अभियानांतर रब्बी क्षेत्र ७ हेक्टर ने वाढले असून फळबाग लागवड ५ हेक्टर पर्यंत होत आहे.

अजून या अभियानातील काही कामे सुरु असली तरी झालेल्या कामांचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत. शेत तलावास पाणी लागल्याने शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केली असून मत्स्यपालन सुरु केले आहे. सुमारे ७ हेक्टर क्षेत्र दुबार पिकाखाली चालू वर्षी वाढले असून ही क्रांती केवळ अभियानामुळे शक्य झाली असे शेतकरी बोलत आहेत.

काराव मध्ये जुलै २०१५च्या पहिल्या टप्प्यातच ४३.९२ टीसीएम इतकी वाढ झाली. तर भूगर्भातील पाणी पातळीही अर्ध्या मीटरने वाढली.

फलोत्पादन वाढले

मार्च २०१६ मध्ये दुसऱ्या टप्प्यात फलोत्पादन क्षेत्रात ५.६० हेक्टरने वाढ झाली तसेच सिंचनाखालील जमीन ४० हेकात्र पर्यंत जाईल असा अंदाज आहे. विशेष म्हणजे कोरड्या झालेल्या ६ विहिरी जिवंत झाल्या आणि पाण्याची उपलब्धता जी डिसेंबर पर्यंत होती ती मे महिन्यापर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे.

ठिबक सिंचनात वाढ

भात शेती नादुरुस्त असल्याने बरेच शेतकरी भात शेती लावत नव्हते परंतु ६० परंतू भात शेती दुरुस्तीमुळे ५५ हेक्टर पर्यंत भाताची लागवड होईल. गावात चारा नव्हताच. पण आता पाण्याच्या सोयीमुळे १ हेक्टरपर्यंत चार लागवड शक्य झाली आहे. ठिबक सिंचनात देखील यंदा १४ हेकातरपर्यंत वाढ होईल . पूर्वी केवळ ४ हेक्टर खेत्रावर ठिबक सिंचन घेतले जायचे.

या गावात लोकांच्या श्रमदानातून गेल्या वर्षी २२ वनराई बंधारे देखील बांधण्यात आले त्यामुळे या उन्हाळ्यात वापरायला आणि जनावरांसाठी पाणी उपलब्ध झाले.

जिवंत झरा...जलकुंभ आणि टँकरमुक्ती

शहापूर तालुक्यातील वेळूक ग्राम पंचायतीच्या हद्दीत येणारे मौजे सुसरवाडी हे गाव 810 लोकसंख्येचे. संपूर्ण गाव आदिवासी वस्तीचे. हे गाव दुर्गम आदिवासी क्षेत्रात येत असून शहापूर तहसिल मुख्यालयापासून 45 कि.मी.अंतरावर आहे. गावासाठी पिण्याच्या पाण्याकरिता दोन विहिरी आहेत दोन्ही विहिरी दरवर्षी मार्च महिन्यापासून कोरडया होतात परिणामत: गावाला उन्हाळयात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आणि मग पावसाळा सुरु होऊस्तोवर गावात टँकरची ये-जा सुरु असते.

गाव टँकरमुक्त होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने सविस्तर सर्वेक्षण केले असता गावाच्या पूर्वेला एक जिवंत झरा असल्याचे निदर्शनास आले. मग काय, गावक-यांशी चर्चा करुन या झऱ्याच्या जागेवर जलकुंभ घेण्याचे ठरले.

होता होता प्रत्यक्षात कामास सुरुवात झाली जानेवारी 2015 मध्ये आणि काम झाले मे 2015 मध्ये. झ-याचा व्यास व खोली वाढविण्यात आली. जलकुंभाचा 22.00 मीटर व्यास असून 8.50 मीटर खोली आहे जलकुंभाचे बहूतांशी खोदकाम कठीण खडकात असून खोदकामातून निघालेल्या दगडाचा वापर करुन दगडी बांधकामात जलकुंभ बांधून सुरक्षित करण्यात आला.

आता जलकुंभाला पुरेसे पाणी उपलब्ध झाले आहे. पावसाळयानंतर म्हणजेच माहे ऑक्टोंबर ते मार्च या कालावधीत 50 ते 60 हजार लिटर प्रतिदिवस पाणी उपलब्ध होईल असा अंदाज असून एप्रिल ते जून या कालावधीत 25 ते 30 हजार लिटर प्रतिदिवस पाणी उपलब्ध होईल. या उन्हाळयात या गावास पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होवू शकणार असल्याने गाव टँकरमुक्त होणे आता दूर नाही.

Achievement
अ. क्र. अचीवमेंट फाइल शीर्षक अचीवमेंट फाइल
1 ठाणे यशोगाथा 1 pdf डाउनलोड (555.32 KB)
2 ठाणे यशोगाथा 2 pdf डाउनलोड (555.32 KB)
त्यावेळी अव्वल प्ले विराम