वाशिम

शिवार झाले जलयुक्त, बळीराजा झाला चिंतामुक्त

  • खरीप हंगामातील उत्पन्नात भरघोस वाढ
  • रब्बी हंगामातही मिळणार पिकांना आधार
  • अभियानामुळे फायदा झाल्याने शेतकरी समाधानी

राज्य शासनाने हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे निर्माण झालेल्या संरक्षित पाणी साठ्यांमुळे वाशिम सारख्या कोरडवाहू जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही चांगला फायदा झाला आहे. रिसोड तालुक्यातील बाळखेड व मोठेगाव येथील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सोयाबीन व तुरीच्या पेरण्या आटोपल्यानंतर पावसाने सलग ४० ते ४१ दिवस पाठ फिरवली होती. या काळात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत निर्माण झालेल्या पाणीसाठ्याचा वापर करूनच शेतकऱ्यांनी आपली पीके वाचविली. इतकेच नव्हे तर जलयुक्त शिवार अभियानातून झालेल्या कामांमुळे सोयाबीन पिकाला पुरेसे पाणी मिळाल्यामुळे यंदा अधिक उत्पन्न मिळाल्यामुळे येथील शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होत असून आपले शिवार जलयुक्त झाल्यामुळे हे शेतकरी चिंतामुक्त झाले असल्याचे दिसत आहेत.

राज्य शासनाच्या वर्षपुर्तीनिमित्त आयोजित पत्रकार दौऱ्याच्यानिमित्ताने बाळखेड व मोठेगावमध्ये जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेली शेतीची कामे पाहण्याची संधी मिळाली. बाळखेड येथील शेतकरी तुकाराम नारायण ढोले यांना कृषी विभागाने जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत शेततळे दिले आहे. त्यांनी पहिल्या पावसानंतर शेततळ्याजवळून वाहत जाणाऱ्या नालीतून शेततळे भरून घेतले. या शेततळ्यामध्ये सुमारे २ टीसीएम पाणीसाठा होतो. तुकाराम ढोले यांनी पावसाने खंड दिल्यानंतर शेततळ्याच्या माध्यमातून स्प्रिंकलरद्वारे सिंचन करून १० एकर क्षेत्रावरील सोयाबीन जगविले व वाढविले. पुरेसे पाणी मिळाल्यामुळे यंदा सोयाबीनच्या उत्पन्नात गतवर्षीपेक्षा तिप्पट वाढ झाल्याचे श्री.ढोले सांगतात. गतवर्षी त्यांना एकरी सुमारे २ क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न झाले होते, मात्र यंदा शेततळ्याच्या माध्यमातून झालेल्या सिंचनामुळे एकरी सुमारे ३ ते ७ क्विंटल सोयाबीन झाल्याचे त्यांनी सांगितले. असाच अनुभव गावातील इतर तीन शेततळ्यांच्या लाभार्थ्यांनीही व्यक्त केला आहे.

बाळखेड व मोठेगाव या दोन्ही गावामध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातूनही भूजल पुनर्भरणचे काम झाले आहे. गावाच्या बाजूने वाहत जाणाऱ्या नाल्याचे एक ते दीड किलोमीटरपर्यंत तीन टप्प्यात खोलीकरण करण्यात आले आहे. तर या खोलीकरणामध्ये गाळ जमा होवू नये, यासाठी खोलीकरणाच्या सुरुवातीला व मध्यभागी दगड व जाळीचा गॅबियन बंधारा तयार करण्यात आला आहे. नाल्याच्या खोलीकरणमध्ये जमा झालेले पाणी जमिनीतून वाहून जाऊ नये, यासाठी भूमिगत प्लास्टिक बंधारा बांधण्यात आला आहे. प्रत्येक टप्प्यात १० ते २० मीटर खोलीचा रिचार्ज शाफ्ट तयार करण्यात आला आहे, जेणेकरून नाल्यामध्ये जमा झालेले पाणी जमिनीत खोलवर जिरावे व भूजल पुनर्भरण व्हावे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या या प्रकल्पामुळे बाळखेडमधील जवळपास १० विहिरी व ११ विंधन विहिरींची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे अंदाजे २० हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन व कपाशीला फायदा झाल्याचे शेतकरी सांगतात. मदन ढोले या शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार या प्रकल्पामुळे यंदा खूप कमी पाऊस होऊनही विहिरींची पाणी पातळी वाढली आहे. तसेच यंदा खरीप हंगामाला पुरेसे पाणी उपलब्ध झाले. विहिरींची सध्याची परिस्थिती पाहता रब्बी हंगामातील हरभरा पिकालाही पाणी कमी पडणार नाही, अशी खात्री आहे.

मोठेगाव येथील शेतकरी बबन पुरी यांच्या विहिरीच्या पाणीपातळीतही भूजल पुनर्भरणच्या कामामुळे चांगली वाढ झाली आहे. यंदा अपेक्षेपेक्षा खूप कमी पाऊस होऊनही श्री.पुरी यांच्या विहिरीत सध्या ८ ते १० फुटांवर पाणी आहे. या पाण्याच्या जोरावर त्‍यांनी आता कांदा व लसून पिकाची लागवड केली आहे. मोठेगावातील दुसरे शेतकरी बाळासाहेब देशमुख यांनी सांगितले की, माझी ३५ एकर शेती आहे. गेल्यावर्षी या शेतामध्ये एकरी ४ ते ५ क्विंटल उतारा मिळाला होता. मात्र, यंदा जलयुक्त शिवार अभियानातून झालेल्या भूजल पुनर्भरणच्या कामामुळे विहिरींमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध झाल्याने ३५ एकरावरील सोयाबीनला पाणी देता आले. त्यामुळे एकरी ८ क्विंटल इतके उत्पन्न मिळाले आहे. विहिरींमधील पाणी पातळी पाहता रब्बी हंगामातही पाणी कमी पडणार नसल्याची खात्री आहे. त्यामुळे ३० एकर हरभरा व ५ एकरावर हळद लागवड केली आहे. या अभियानामुळे आमचा खूप फायदा झाला आहे. शासनाची एखादी योजना इतक्या प्रामाणिकपणे राबविली जाण्याचा व त्यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना फायदा झाल्याचा आपला पहिलाच अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन्ही गावांमधील शेतकरी जलयुक्त शिवार अभियानाबद्दल भरभरून बोलत आहेत. गेली काही वर्षे दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना यंदा जलयुक्त शिवार अभियानामुळे भरघोस उत्पादन मिळाले आहे. त्यामुळे या अभियानाबद्दल शेतकरी राज्य शासनाचे आभार मानताना दिसले. तसेच पुरेसे पाणी मिळाल्यामुळे खरीप हंगामात समाधानकारक उत्पन्न मिळाल्याने शेतकऱ्यांचा उत्साह वाढला असून रब्बी हंगामातही शिवार फुलविण्याच्या तयारीला ते लागले आहे. त्यांना आता पाणी टंचाईची अथवा नापिकीची कोणतीही चिंता सतावत नसल्याचे यावेळी जाणवले. यावरून एकच खात्री पटली की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पानुसार राज्यातील प्रत्येक गाव जलयुक्त शिवार अभियानाद्वारे टंचाईमुक्त झाले तर राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाची चिंता राहणार नाही. नापिकीचे संकट ओढवणार नाही, बळीराजा कर्जबाजारी होणार नाही आणि मरणाला कवटाळणार नाही. त्यामुळे महाराष्ट्राला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक कायमचा पुसला जाईल, एवढे नक्की

तानाजी घोलप,
जिल्हा माहिती कार्यालय, वाशिम

त्यावेळी अव्वल प्ले विराम